कराड प्रतिनिधी । पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गालगत कराड तालुक्यातील गोटे गावच्या हद्दीलगत असलेल्या हॉटेल सॅफ्रॉन शेजारील जागीच्या वादातून तिघांवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना आज मंगळवार सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये कराड पंचायत समिती माजी सदस्य नामदेव पाटील यांचे बंधु मुकुंद काशिनाथ पाटील (वय 46) व पुतण्या नयन बाळासाहेब पाटील (वय 27) यांच्यासह एक कर्मचारी मतीन मुतवल्ली हे जखमी झाले असून त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे वारुंजी परिसरात एकच खळबळ उडाली असून घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कराड तालुक्यातील वारूंजी येथी माजी पंचायत समिती सदस्य नामदेव पाटील यांचे गोटे गावच्या हद्दीत हॉटेल सॅफ्रॉन आहे. हॉटेल शेजारी असलेल्या जागेवरून नामदेव पाटील व त्यांचे भागीदार व गावातील मूतवल्ली समाजातील काही लोक यांच्यात वाद होता. या कारणावरून आज सायंकाळी सुमारे बारा ते पंधरा लोकांच्या जमावाने धारदार शस्त्रांनी नामदेव पाटील यांचे बंधू बाळासाहेब पाटील व पुतण्या नयन पाटील आणि एक कामगार अशा तिघांवर हल्ला केला. या हल्ल्यात बाळासाहेब पाटील यांच्या पाठीवरती गंभीर वार झाला आहे. तर पुतण्या नयन याच्या दोन्ही हाताला जखम झाली आहे. तसेच कामगारही या हल्ल्यात किरकोळ जखमी झाला आहे.
हल्ल्याच्या घटनेनंतर काही वेळेतच लाक त्या ठिकाणी जमा झाले. त्यामुळे हल्लेखोर तेथून पसार झाले. काही जणांनी कराड शहर पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती दिली असता पोलिसही तत्काळ त्या ठिकाणी दाखल झाले. सध्या जखमींवर कराडच्या एक खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनेनंतर पोलिसांनि जखमींची फिर्याद घेतली असून यावरून कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरु होती.