सातारा प्रतिनिधी । जिल्ह्यातील मागील चार दिवसांपासून पाऊस पडत असून जिल्ह्यात ६ जून रोजी मान्सून दाखल झाला. गुरूवारी सायंकाळपासून जिल्ह्यात सर्वदूर पाऊस पडत पश्चिमेकडील कोयना, नवजा, महाबळेश्वर, तापोळा, बामणोली भागात दमदार हजेरी लावली आहे. हा पाऊस खरीप हंगामासाठीही उपयुक्त ठरला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून पेरणीसाठी खते आणि बियाण्यांची जुळवाजुळव सुरू झाली आहे. तर कोयना धरणातील विसर्ग बंद करण्यात आला आहे. धरणात सध्या १५.२३ टीएमसी साठा झाला आहे.
सातारा जिल्ह्यात मे महिन्यात वळवाचा पाऊस कमी झाला. त्यामुळे संपूर्ण लक्ष मान्सूनच्या पावसाकडे होते. यंदा तरी मान्सूनचा पाऊस वेळेत दाखल होणार याकडे सर्वांचे लक्ष होते. कारण, जिल्ह्यात दुष्काळी स्थिती असल्याने चारा आणि पाण्याची स्थिती बिकट होती. आणि यंदा मान्सूनचा पाऊस वेळेवर दाखल झाला असून अनेक गावांतील बंधाऱ्यात बऱ्यापैकी पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांना पाणी देताना याचा फायदाच होणार आहे. परिणामी शेतकऱ्यांकडून खते आणि बियाणे दुकानात गर्दी केली जात आहे.
महाबळेश्वरला 15 मिलीमीटर पाऊस
सातारा जिल्ह्यात सतत कोसळत असलेल्या पावसाने रविवारी देखील जिल्ह्यात ठिकठिकाणी हजेरी लावली. सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत सर्वाधिक पाऊस महाबळेश्वरला १५ मिलीमीटर झाला. तर कोयनानगर येथे ३ आणि नवजाला ९ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंदनों झाली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक पाऊस नवजा येथे १०२ मिलीमीटर पडलेला आहे.
जिल्ह्यातील शेती क्षेत्र (हेक्टरमध्ये)
एकूण भौगोलिक क्षेत्र : १०५८२००
जंगल व्याप्त क्षेत्र : १३७९००
बिगर शेती क्षेत्र : २७७००
लागवडी लायक नसलेले क्षेत्र : ९३१००
लागवडी लायक पण वापरात नसलेले : ४२३००
खरीप हंगाम सर्वसाधारण क्षेत्र : ३८१७००
रब्बी हंगाम सर्वसाधारण क्षेत्र : १९५८००
उन्हाळी हंगाम सर्वसाधारण क्षेत्र : ४४००
आले, हळद, बटाटा, कांदा, भाजीपाला, फळपिके एकूण क्षेत्र : ६९१००
एकूण लागवडी लायक क्षेत्र : ५७०३००
बागायत (निव्वळ) : १७५५००
जिरायत (निव्वळ) : ३९४८००