जिल्ह्यातील दिग्गजांचा होणार आज फैसला; कोण कोणावर पडणार भारी!

0
5
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । लोकशाहीचा मतोत्सव बळकट करण्यासाठी जिल्ह्यातील मतदारांनी सरासरी ७१.९३ टक्के मतदान केले. सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघात अटीतटीच्या लढती झाल्याने उमेदवारांच्या हृदयामध्ये धडधड वाढू लागली आहे. विधानसभेला लोकसभेपेक्षा मतांचा टक्का वाढल्याने या वाढीव मतदानाचा फायदा कोणाला होणार हे आज स्पष्ट होणार आहे. दरम्यान, आज जिल्ह्यातील १०९ उमेदवारांपैकी आमदारकीची माळ कुणाच्या गळ्यात पडणार? कोण कोणावर पडणार भारी तसेच कुणाचा होणार करेक्ट कार्यक्रम? हे आज निकालानंतर समजणार आहे.

सातारा जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असाच खरा सामना आहे. आठ विधानसभा मतदारसंघात एकूण १०९ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद झाले. यामध्ये ५७ अपक्ष उमेदवार आहेत. सातारा कोरेगाव, माण, फलटण, कराड उत्तर व कराड दक्षिणमध्ये दुरंगी लढती आहेत. तर पाटण व वाई या दोन मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी व महायुतीमध्ये बंडखोरी झाल्याने अपक्षांनी उमेदवारांची गणिते बिघडवली आहेत.

कुठल्या मतदारसंघात किती टक्के मतदान?

२५५ फलटण : ७१.०८
२५६ वाई : ६७.५८
२५७ कोरेगाव : ७७.६४
२५८ माण ७१.००
२५९ कराड उत्तर : ७४.६७
२६० कराड दक्षिण : ७६.२६
२६१ पाटण : ७३.२५
२६२ सातारा : ६३.५२

१) माण-खटावमध्ये करेक्ट कार्यक्रम कुणाचा?; जयकुमार गोरे विरुद्ध प्रभाकर घार्गे

जिल्ह्यातील कायम दुष्काळी भागातील माण-खटाव विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार जयकुमार गोरे चौथ्या विजयासाठी निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून माजी आमदार प्रभाकर घार्गे मैदानात उतरले. याठिकाणी घार्गे यांच्या पाठीशी मोठ्या नेत्यांची ताकद उभी आहे. पण, येथे आघाडीतील नाराज शेखर गोरे आता बंधू विद्यमान आमदार जयकुमार गोरे यांच्यासोबत गेले. शेखर गोरेंनी बंधू जयकुमार गोरे यांचा प्रचार करण्यास सुरुवात केली. आता दोन्ही गोरे बंधू एकत्रित आल्याने घार्गे यांच्यासाठी ही निवडणूक जड जाणार हे नक्की. मात्र, माण खटावमध्ये कुणाचा करेक्ट कार्यक्रम होणार हे थोड्यावेळातच स्पष्ट होणार आहे.

२) पाटणच्या गड कोण राखणार? देसाई, पाटणकर कि कदम

पाटण विधानसभा मतदारसंघात २०१९ साली विधानसभेसोबतच लोकसभेची पोटनिवडणूक होऊनही त्यावेळी ६७ टक्के मतदान झाले होते. यावेळी तब्बल ७४ टक्के इतके मतदान झाल्याने वाढीव ७ टक्के मतदान नक्की कोणाला तारक व कोणाला मारक ठरणार याकडे आता सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत. मंत्री शंभूराज देसाई यांच्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष या मतदार संघाकडे लागले आहे. देसाईंसह अपक्ष उमेदवार सत्यजित पाटणकर, महायुतीचे उमेदवार हर्षद कदम यांच्यात तिरंगी सामना असल्याने निकालाबाबत कमालीची उत्सूकता लागून राहिली आहे. सन २०१९ च्या निवडणुकीत येथे विधानसभेत शंभूराज देसाईंना १,०५,८९२ तर सत्यजित पाटणकरांना ९१,४३५ व अन्य पक्ष, अपक्ष, नोटा यांच्यात ५,९३७ मतांची विभागणी झाली होती. यावेळी देसाई १४,४५७ मताधिक्यांनी निवडून आले होते.

) कोरेगावात कोण मारणार बाजी? शशिकांत शिंदे की महेश शिंदे

कोरेगाव विधानसभा मतदारसंघात दोन शिंदेंमध्ये लढत होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून शशिकांत शिंदे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर त्यांच्याविरोधात शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार महेश शिंदे यांनी शड्डू ठोकला. कोरेगाव मतदारसंघात यंदाही काटे की टक्कर पाहायला मिळाली. मागील निवडणुकीत आमदार शशिकांत शिंदे यांचा शिवसेनेकडून मैदानात उतरलेल्या महेश शिंदे यांनी पराभव केला. आता दोघेही पुन्हा समोरासमोर आले आहेत.

४) कराड दक्षिणेत मतदारांची साथ हाताला कि कमळाला? पृथ्वीराज चव्हाण कि डॉ. अतुलबाबा भोसले

कराड दक्षिण मतदार संघात यंदा २०२४ च्या निवडणुकीत भाजप महायुतीचे उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले (Atul Bhosale) यांनी काँग्रेसचे महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराजबाबा चव्हाण (Prithviraj Chavan) यांच्यासमोर तगडे आव्हान उभे केले. आता या मतदार संघात प्रत्यक्ष मतदान पार पडले असून कराड दक्षिणमध्ये ७६.३२ टक्के मतदान झाले आहे. कराड दक्षिण विधानसभा मतदार संघात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि भाजपचे नेते डॉ. अतुल भोसले यांनी प्रचाराचा चांगलाच धुरळा उडविलयाचे पहायला मिळाले. आता या ठिकाणी मतदार बांधवांनी कुणाला साथ दिली हे पहायला मिळणार आहे.

५) कराड उत्तरचा बालेकिल्ला कुणाकडे जाणार? बाळासाहेब पाटील कि मनोज घोरपडे

कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र शरद पवार गटाकडून राज्याचे माजी सहकार मंत्री व विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील विरुद्ध भाजपचे मनोज घोरपडे असा सामना रंगला. बाळासाहेब पाटील आतापर्यंत पाच वेळा कराड उत्तरचे आमदार राहिलेत. मात्र, यंदाची निवडणूक त्यांच्यासाठी सोप्पी नक्कीच राहिलेली नाही. त्यामुळे उत्तरेत यंदा कमळ फुलणार की तुतारीतला आवाज घुमणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

६) फलटणमध्ये दोन्ही निंबाळकरांची प्रतिष्ठा पणाला; दीपक चव्हाण कि सचिन कांबळे-पाटील

फलटण विधानसभा मतदार संघामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून आमदार दीपक चव्हाण चौकार ठोकण्याच्या तयारीत आहेत. दीपक चव्हाण हे फलटणचे विद्यमान आमदार असले तरी जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर हेच फलटणचे किंगमेकर राहिलेत हे वेगळं सांगायला नको. विरोधात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सचिन कांबळे यांनी आव्हान उभे केले. पण, या मतदारसंघात विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यातच कस लागणार आहे. दोघेही दोन उमेदवारांच्या पाठीशी आहेत. दोघांसाठी ही लढत प्रतिष्ठेची बनली आहे. यामध्ये कोणाची प्रतिष्ठा उंचावणार व कोणाची धुळीस मिळणार हे निकालाअंती कळणार आहे.

७) वाईकरांची पसंती कुणाला? अरुणदेवी पिसाळ कि मकरंद आबांना

वाई विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि विद्यमान आमदार मकरंद पाटील उभे असून त्यांच्या विरोधात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने माजी जिल्हा परिषद अध्यक्षा अरुणादेवी पिसाळ यांना निवडणूक रिंगणात उतरल्या. तर अपक्ष म्हणून पुरुषोत्तम जाधव हे देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अरुणादेवी पिसाळ या कै. मदनराव पिसाळ यांच्या सून असून मकरंद पाटील यांच्यापुढे त्यांचे कडवे आव्हान आहे. त्यातच अपक्ष पुरुषोत्तम जाधव यांच्यामुळेही विभागातील गणिते बदलण्याची शक्यता आहे.

८) सातारकर कुणाच्या बाजूने? शिवेंद्रराजे भोसले की अमित कदम

सातारा विधानसभा मतदारसंघातून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे भाजपकडून पुन्हा उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले. शिवेंद्रराजे यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून ठाकरेंच्या शिवसेनेने अमित कदम यांना मैदानात उतरवले. आधीच शिवेंद्रराजेंचा एकहाती दबदबा, त्यात उदयनराजेंची साथ आहे. तरीही कदम यांना महाविकास आघाडी आणि जनतेची किती ताकद मिळाली. हे पाहावे लागणार आहे.