कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघातील १०९ उमेदवारांच्या निकालाचा निर्णय आज होणार आहे. थोड्याच वेळात सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी मतमोजणीस सुरुवात करण्यात आली आहे. आज होत असलेल्या मतमोजणीमुळे जिल्हावासियांची उत्सुकता ताणली गेली असून मातब्बर उमेदवारांची उलघाल वाढली आहे. त्यामुळे काही तासांत हाती येणाऱ्या निकालाकडेच सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
१) वाई मतदारसंघात २४ फेऱ्यांमध्ये होतेय मतमोजणी
वाई विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी ही महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदाम क्रमांक ५ येथे होत आहे. टपाली व ईव्हीएम मशीनद्वारे मतमोजणीसाठी एकूण २९ टेबलद्वारे ४७१ मतदान केंद्रांच्या मोजणीसाठी २४ फेऱ्यांद्वारे निकाल जाहीर केला जाणार आहे. ईव्हीएम मतदान यंत्रांच्या मतमोजणीसाठी एकूण २० टेबल्स ठेवण्यात आली असून, टपाली मतपत्रिका मोजण्यासाठी ६ टेबल आणि सैनिकी मतदार यांच्या मतपत्रिकांसाठी एकूण ३ टेबल ठेवण्यात आली आहे. एकूण २९ टेबलांद्वारे सकाळी आठ वाजता मतमोजणीची प्रक्रिया सुरु केली जाणार आहे.
२) फलटणमध्ये पार पडतायत मतमोजणीच्या 26 फेर्या
फलटण-कोरेगाव विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी 8 वा. फलटण येथील शासकीय धान्य गोदाम येथे होणार आहे. या ठिकाणी सुरुवातीला पोस्टल मते मोजली जाणार आहेत. त्यानंतर 14 टेबलवर ईव्हीएम मतांची मोजणी 26 फेर्यात होणार आहे. तर पोस्टल मतमोजणीसाठी 10 टेबल, इटीपीबीएस मतमोजणीसाठी 5 टेबल अशा 29 टेबलवर मतमोजणी होणार आहे. मतमोजणीसाठी एकूण 250 कर्मचार्यांची नियुक्ती केली आहे. प्रत्येक फेरीत 14 मतदान केंद्रांची मतमोजणी होणार आहे. पहिल्या फेरीत 1 ते 14, दुसर्या फेरीत 15 ते 28 अशा पद्धतीने एकूण 26 फेर्यात 355 केंद्रांची मतमोजणी होणार आहे. 26 वी फेरी 5 मतदान केंद्राची असेल. प्रत्येक फेरी पूर्ण झाल्यानंतर लगेचच फेरीचा निकाल घोषित केला जाणार आहे.
३) साताऱ्यात ४० टेबलवर २४ राऊंडमध्ये मतमोजणी
२६२ सातारा विधानसभा मतदारसंघातील ३ लाख ४२ हजार ६७२ मतदारांपैकी २ लाख १७ हजार ७०० मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. उद्या शनिवारी मतमोजणी होत आहे. सकाळी ८ वाजता सर्वप्रथम टपाली मतमोजणीस प्रारंभ होणार आहे. त्यानंतर अर्ध्या तासाने मतदान यंत्रातील मतांची मोजणी सुरू होणार असून सुमारे ४० टेबलवर २४ राऊंडमध्ये मतमोजणी पूर्ण होणार आहे.
४) कराड उत्तरची १४ टेबलावरून मतमोजणी केली जाणार
कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी विविध १४ पथके स्थापन करण्यात आली आहेत. १४ टेबलावरून मतमोजणी केली जाणार आहे.
५) कराड दक्षिणची मतमोजणी हि 20 टेबलवर 17 ते 18 राउंडमध्ये होणार
कराड दक्षिण विधानसभा मतदार संघाची मतमोजणी करण्यासाठी सकाळी आठ वाजून दहा मिनिटांपर्यंत सर्व टेबलवर मशीन्स आणल्या जाणार आहेत.आणि बरोबर साडेआठ वाजता मशीनच्या मतमोजणीस सुरुवात होईल. मशीनमधील मतमोजणीचे 20 टेबलवर 17 ते 18 राउंड होतील आणि त्यानंतर निकाल घोषित केला जाईल.
६) माणमध्ये 20 टेबलावर होणार मोजणी
माण-खटाव विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी सकाळी आठ वाजता सुरू होणार असून वीस टेबलवर ईव्हीएम मशीनची मतमोजणी होणार आहे. दहिवडीतील शासकीय गोदाम सज्ज झाले असून मतमोजणीच्या १९ फेऱ्या होणार आहेत. दहिवडी येथील मायणी रस्त्या जवळील शासकीय गोदाम येथे मतमोजणी होणार आहे.
७) पाटण विधानसभेसाठी 18 टेबलावर मतमोजणी
पाटण विधानसभा मतदारसंघात झालेल्या निवडणुकीची मतमोजणी शनिवार, २३ नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजल्यापासून येथील समाज कल्याण विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात होणार आहे.सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. पहिल्यांदा सात टेबलवर टपाली मतांची मोजणी तर त्याचदरम्यान तीन टेबलवर सैनिक मतदान स्कॅनिंग होऊन त्याची मोजणी केली जाणार आहे. ईव्हीएमद्वारे झालेल्या मतदानाची १८ टेबलवर मतमोजणी होणार आहे. प्रत्येक टेबलसाठी पर्यवेक्षक, सहाय्यक व सूक्ष्म निरीक्षक यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. एकूण २४ फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी होणार असून अंतिम निकाल दुपारपर्यंत लागण्याच्या शक्यता वर्तवण्यात आल्या आहेत.
८) साताऱ्यात मतदान मोजणीस सुरुवात
सातारा जिल्ह्यात सर्वाधिक मतदान कोरेगाव मतदारसंघात झाले आहे. येथील दोन प्रतिस्पर्धी आमदारांच्या झुंजीत मतांच्या वाढलेल्या टक्केवारीचा लाभ कुणाला याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील कोरेगाव विधानसभा मतदारसंघ राज्यात लक्षवेधी ठरला आहे. या ठिकाणी सकाळी आठ वाजता मतमोजणी केली जाणार आहे.