पाटण प्रतिनिधी । कराड तालुक्यातील आगाशिवनगर येथून गुरुवारी एक वृद्ध महिला बेपत्ता झाली होती. त्या महिलेचा कुटुंबियांकडून शोधही घेतला जात होता. कुटुंबीयांनी याबाबत पोलीस ठाण्यातही फिर्याद दिली होती. मात्र, बेपत्ता झालेल्या वृद्ध महिलेचा अखेर माहेरी गलमेवाडी-कुंभारगाव, ता. पाटण येथील एक सार्वजनिक विहिरीत मृतदेह आढळून आला.
चंद्रकला शंकर माटेकर (वय 65, सध्या रा. आगाशिवनगर) असे मृत वृद्ध महिलेचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पाटण तालुक्यातील चिचांबा- माटेकरवाडी – कुंभारगाव या ठिकाणी राहत असलेलया शंकर पाटेकर यांनी आगाशिवनगर या ठिकाणी घर घेतले. त्या याठिकाणी ते स्थायिक झाले. दरम्यान गुरुवारची त्यांच्या पत्नी चंद्रकला माटेकर या घरातून कोणास काहीही न सांगता निघून गेल्या. त्या घरात नसल्याचे पाहून त्यांच्या कुटुंबीय व नातेवाईकांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र, त्यांचा कुठेच पत्ता लागला नसल्याने अखेर त्यांच्या नातेवाईंकांनी कराड शहर पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली.
नातेवाईकांच्या फिर्यादीनंतर पोलिसांकडूनही वृद्ध महिलेचा शोध घेतला जात असताना गुरूवारी सायंकाळी चंद्रकला माटेकर या त्यांचे माहेर असलेल्या गलमेवाडी या गावात त्यांना गावातीलच काही लोकांनी पाहिले होते. दरम्यान, शुक्रवारी सकाळी तेथील सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या विहिरीजवळ त्यांच्याकडे असलेली पिशवी व चप्पल आढळून आल्याने ग्रामस्थांचा संशय आला. याबाबत खात्री केल्यावर त्यांचा मृतदेह विहिरीत आढळून आला.
गावातील काही ग्रामस्थांनी याची माहिती तात्काळ पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अभिजित चौधरी हे आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांना घेऊन तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संबंधित वृद्ध महिलेचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. तसेच कराड येथील रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. सायंकाळी उत्तरीय तपासणी केल्यानंतर संबंधित वृद्धेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेचा अधिक तपास पोलिसांकडून केला जात आहे.