कराड प्रतिनिधी | दोन ट्रॅक्टर मालकांची ऊसतोड मजूर पुरविण्याच्या नावाखाली मुकादमाने अकरा लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी मुकादामावर कराड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवे मालखेड, ता. कराड येथील ट्रॅक्टर मालक शशिकांत सुभाष मारे यांनी दिलेल्या फिर्यादिवरून अनिल बंडू धोत्रे (रा. ताकरवन, ता. माजलगाव, जि. बीड) या मुकादमावर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नवे मालखेड येथील शशिकांत मोरे व त्यांचे मित्र उमेश लोकरे यांचे ऊस वाहतुकीचे ट्रॅक्टर आहेत. कृष्णा कारखान्यासाठी ते उसाची वाहतूक करतात. २०२२- २३ च्या गळीत हंगामासाठी ऊसतोडीचा करार करण्याबाबत त्यांनी मुकादम अनिल धोत्रे याच्याशी चर्चा केली होती. त्यावेळी ऊस तोडीसाठी अठरा मजूर पुरवितो, असे सांगून मुकादमाने दहा लाख रुपयांची मागणी केली. त्यानुसार शशिकांत मोरे व त्यांचे मित्र उमेश लोकरे यांनी मुकादम अनिल धोत्रे याच्या बँक खात्यावर वेळोवेळी दहा लाख रुपये जमा केले. त्यानंतर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी शशिकांत मोरे हे ऊसतोड मजूर आणण्यासाठी बीड जिल्ह्यातील ताकरवन येथे मुकादामाच्या घरी गेले असता एक मजूर पुण्याला असून त्याला मी घेऊन येतो, असे सांगून मुकादम धोत्रे याने आणखी एक लाख रुपयांची मागणी केली. मोरे यांनी त्याला पैसे दिल्यानंतर तो तेथून निघून गेला.
शशिकांत मोरे यांच्यासह त्यांचे सहकारी ताकरवन गावात चार दिवस थांबून होते. मात्र, मुकादम परत न आल्यामुळे सर्वजण गावी आले. तेव्हापासून त्यांचा मुकादम अनिल धोत्रे याच्याशी कसलाच संपर्क झाला नाही. अनिल धोत्रे याने आपली फसवणूक केल्याचे निदर्शनास आल्यानंतर शशिकांत मोरे यांनी याबाबतची फिर्याद कराड तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक अब्दुलहदी बिद्री तपास करीत आहेत.