कराड प्रतिनिधी । सध्या सोशल मीडिया वापरणाऱ्यांचे प्रमाण चांगलेच सोशल मीडियाचा काहीजण चांगला फायदा घेतायत तर काहीजण गैरफायदा देखील घेत आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून महिलेचे अश्लील फोटो त्यावर पोस्ट केल्याप्रकरणी अज्ञातावर कराड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित महिलेने फिर्याद दाखल केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पीडित महिलेने काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर तिचे अकाउंट तयार करून काही फोटो टाकले होते. अज्ञाताने ते फोटो मॉर्फ करून अश्लील फोटो बनवले. त्यानंतर सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून त्याने ते फोटो त्यावर पोस्ट केले. तसेच त्या फोटोला आक्षेपार्ह गाणे जोडण्यात आले होते. फोटोखाली आक्षेपार्ह कॅप्शनही लिहिण्यात आले होते. इतर मजकूरही अश्लील होता.
पीडित महिलेच्या बहिणीने सोशल मीडियावर असलेले हे फोटो पाहिल्यानंतर संबंधित महिलेला याबाबतची माहिती दिली. पीडित महिलेने याप्रकरणी कराड शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक राजू ताशिलदार तपास करीत आहेत.