पाटण प्रतिनिधी । “आमच्या कार्यक्षेत्रात कोणी ढवळाढवळ करू नये,” असा इशारा देऊनही पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या (Shambhuraj Desai) लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याने वार्षिक सभेत सह्याद्रि कारखान्याच्या कार्यक्षेत्रात सभासदत्व देण्याचा ठराव घेतला. त्यावर आमदार बाळासाहेब पाटलांनी (Balasaheb Patil) पाटणमधील कार्यक्रमात चकार शब्द न काढता आपल्या शांत आणि संयमीपणाचे दर्शन घडवले.
पाटण तालुका दुध उत्पादक सहकारी संघाचं नामकरण आणि रौप्य महोत्सवी वर्षाची सांगता, असा संयुक्त कार्यक्रम आज सोनगाव-लुगडेवाडी (ता. पाटण) येथे झाला. या कार्यक्रमास माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, माजी पालकमंत्री, आ. बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, पाटणचे युवा नेते सत्यजितसिह पाटणकर, राजाभाऊ शेलार, हिंदुराव पाटील, ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष हर्षद कदम उपस्थित होते. कारखान्याच्या सभासदत्वाच्या ठरावावरून उद्भवलेल्या वादावर आ. बाळासाहेब पाटील काय बोलतात, याची राजकीय वर्तुळात उत्सुकता होती. मात्र, कराड उत्तरकरांचा बार फुसका ठरला.
आ. बाळासाहेब पाटील यांनी नेहमीप्रमाणे गुळगुळीत भाषण केलं. देसाई कारखान्याने घेतलेल्या ठरावाबद्दल चकार शब्द काढला नाही. त्यामुळे कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सह्याद्रि कारखान्याचे कार्यक्षेत्र असलेल्या सुपने परिसरातील लोकांची निराशा झाली. आ. पाटील यांनी आपल्या शांत आणि संयमी स्वभावाप्रमाणे भाषणाचे सोपस्कार उरकले त्यामुळे त्यांची उपस्थिती फक्त पाहुण्यासारखी दिसून आली.