सातारा प्रतिनिधी | राज्य सरकारने नुकतीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे घोषणा केली. या घोषणेनंतर त्याची नेमकी अंमलबजावणी कशी केली जाणार?हे देखील सरकारने सांगितले. आता प्रत्यक्षात या योजनेची अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली असून सध्या पाऊस पडल्याने शेतात पेरणीची कामे सुरू असून अंगणवाडी सेविका थेट बांधावर पोहोचून लाडक्या बहिणींना या योजनेचे महत्त्व समजावत त्यांचे अर्ज भरुन घेत आहेत. सातारा जिल्हा प्रशासनाकडून राबविण्यात येणाऱ्या या पद्धतीचे सर्वत्र कौतूक आणि स्वागत होत आहे.
सातारा जिल्ह्यात घरोघरी जाऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरून घेण्याची मोहीम सुरू आहे. पेरणीचे दिवस असल्याने दिवसभर महिला शेतीचे कामात व्यस्त असतात अशाच शेतात राबणाऱ्या बहिणींना या योजनेची माहिती देत त्यांचा अर्ज भरुन देण्याचं काम मोडकवाडी जिंती येथील अंगणवाडी सेविका करत आहेत.
सातारा जिल्ह्यात घरोघरी जाऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरून घेण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. पेरणीचे दिवस असल्याने दिवसभर महिला शेतीचे कामात व्यस्त असतात. अशाच शेतात राबणाऱ्या बहिणींना या योजनेची माहिती देत शिंगणवाडी येथील अंगणवाडी सेविकांनी महिला भगिनींचे अर्ज भरुन घेतले आहेत.
योजनेतील उत्पन्न प्रमाणपत्रासह काही अटी शिथील…
लाडक्या बहीण योजनेसाठी कुणीही महिला भगिनींकडून जादा पैसे किंवा लाचेची मागणी केल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेशच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. तर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनीही जिल्हा प्रशासनाला संबंधित योजना सहज सुलभरितीने राबविण्याच्या सूचना केल्या आहेत. त्याच, अनुषंगाने सरकारने या योजनेतील कागदपत्रांची पूर्तता आणखी कमी केली असून केवळ रेशनकार्ड, मतदान ओळखपत्रांच्या आधारेही योजनेसाठी महिलांना अर्ज करता येणार आहे. या योजनेतील उत्पन्न प्रमाणपत्राची अट आता शिथील करण्यात आली आहे.
याठिकाणी भरले जातात अर्ज
दरम्यान, सध्या नारीशक्ती दूत अॅपद्वारे या योजनेचा अर्ज भरला जात आहे. तसेच, ऑनलाईन पोर्टलद्वारे, सेतू कार्यालात, पंचायत समितीमधील महिला व बालकल्याण विभागातही लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरुन घेतले जात आहेत. तर, विविध राजकीय पक्षांनीही त्यांच्या कार्यालयात अर्ज भरुन घेण्याचं काम सुरू केल्याचं पाहायला मिळत आहे.
आतापर्यंत ऑनलाइन 10 हजार महिलांनी नोंदणी
शासनाच्या लाडकी बहीण योजनेला मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत ऑनलाइन 10 हजार महिलांनी नोंदणी केली आहे, तसेच अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून शहरी भागातील १७००, तर ग्रामीण भागात चार हजारांवर नोंदणी झाली आहे.