कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील कुसूर येथील एका युवकाचा ढेबेवाडी परिसरात खून झाल्याची घटना घडली असून संबंधित युवकाचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थित मृतदेह पोलिसांना आढळून आला आहे. ऋतुराज दिलीप देशमुख (वय 31, रा. कुसूर, ता. कराड) असे युवकाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, कराड तालुक्यातील वांग नदीपासून काही अंतरावर असलेल्या ढेबेवाडी – कराड मार्गावर सोमवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास संबंधित युवकाचा मृतदेह पोलिसांना आढळून आला. याची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक अभिजित चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विकास सपकाळ तसेच इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी त्याठिकाणी संबंधित युवक रक्ताच्या थारोळ्यात जखमी अवस्थेत पडलेलया स्थितीत आढळून आला.
यावेळी पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने युवकाला रुग्णवाहिकेतून कराड येथील रुग्णालयात उपचारासाठी नेऊ लागले. मात्र, संबंधित युवकाने रस्त्यातच आपले प्राण सोडले. दरम्यान, या घटनेनंतर कुसुर परिसरात एकच खळबळ उडाली असून घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक विवेक लावंड, तसेच पाटण तालुक्यातील विविध पोलिस ठाण्याचे अधिकारी, फॉरेन्सिक लॅबचे पथक, श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. युवकाच्या मृत्यू प्रकरणी सध्या नेमके कारण स्पष्ट झाले नसले तरी पोलिसांकडून याची चौकशी केली जात आहे.