सातारा जिल्ह्यात सरासरी 10.4 मि.मी. पाऊस; नद्यांच्या पाणी पातळीत वाढ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । जिल्ह्याच्या पश्चिम भागात मागील तीन आठवड्यांपासून पाऊस पडत आहे. कास, बामणोली, तापोळा, कोयना, नवजा, महाबळेश्वरसह संपूर्ण कांदाटी खोऱ्यात जोरदार पाऊस पडलयामुळे परिसरातील ओढे, नाले भरून वाहत आहेत. तसेच भातखाचरेही भरून गेली आहेत. त्याचबरोबर जोरदार पावसामुळे धोम, बलकवडी, कोयना, तारळी, कण्हेर, उरमोडीसारख्या प्रमुख धरणांतील पाणीसाठाही वाढत चालला असून सातारा जिल्ह्यात सरासरी 10.4 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 266.2 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस एकूण सरासरीच्या ३० टक्के इतका आहे.

आतापर्यंत जिल्ह्यात पडलेल्या तालुका निहाय पावसाची आकडेवारी मि.मी. मध्ये असून कंसातील आकडे आतापर्यंतच्या एकूण पावसाचे आहेत. यामध्ये सातारा –5.7 (269.5), जावली-मेढा – 8.8(492.9), पाटण –34.0 (497.5), कराड –11.0 (123.6), कोरेगाव –2.2 (122.7), खटाव – वडूज –1.3 ( 91.5), माण – दहिवडी –1.2 (91.5), फलटण –0.8 (67.1), खंडाळा –2.1 (93.7), वाई –6.8 (201.5), महाबळेश्वर –51.9 (1485.7) या प्रमाणे पाऊस झाला आहे.

मुसळधारपणे कोसळत असलेल्या या पावसामुळे पाटण तालुक्याच्या मोरणा विभागात ओढे धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. तसेच तालुक्यातील काही गावांचा संपर्कही तुटला आहे. या विभागातील ग्रामस्थांना घराबाहेर पडणेही अवघड झालेले आहे. जावळी, वाई तालुक्यांच्या पश्चिम भागातही जोरदार पाऊस पडत आहे. या पावसामुळे कोयना, कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ झालेली आहे.