सातारा प्रतिनिधी | फलटण तालुक्यात कृषी निविष्ठा भरारी पथकाने विविध कृषी सेवा केंद्रांची तपासणी केली. यामध्ये ४ लाख ५७ हजार ८४५ रुपये किमतीच्या रासायनिक खतांची विक्री बंद करण्याचे आदेश दिले.
तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड व पंचायत समितीचे कृषी अधिकारी तथा गुण नियंत्रण निरीक्षक नवनाथ फडतरे यांनी संयुक्त कारवाई केली. यावेळी गायकवाड म्हणाले की, ”कृषी निविष्ठा खरेदी करताना दुकानदाराकडून पक्की पावती घ्यावी, तसेच गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत विक्रेत्यांकडूनच निविष्ठा खरेदी करावी. बनावट भेसळयुक्त कीटकनाशकांची खरेदी टाळण्यासाठी कीटकनाशकाचे वेस्टन पिशवी खरेदीची पावती व त्यातील थोडे कीटकनाशक जपून ठेवावे.
कमी वजनाच्या निविष्ठा तसेच छापील किमतीपेक्षा जास्त किमतीने विक्री अथवा इतर तक्रारीसाठी कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा. खतांच्या खरेदीची पावती पिकांची कापणी होईपर्यंत जपून ठेवावी. भेसळीची शंका दूर करण्यासाठी खतांची पाकिटे व गोणी सीलबंद, मोहरबंद असल्याची खात्री करावी. कमी वजनाच्या निविष्ठा तसेच छापील किमतीपेक्षा जास्त किमतीने विक्री अथवा इतर तक्रारीसाठी कृषी विभागाच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालय व कृषी विभाग पंचायत समिती यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन गायकवाड यांनी केले आहे.