सातारा जिल्ह्यात ‘इतकी’ टक्के झाली खरिपाची पेरणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात गेल्या आठ दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यातच २७ जुलैपर्यंत जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनही सतर्क झाले आहे. पावसाळा सुरुवात होताच शेतकऱ्यांकडून खरिपाची पेरणी देखील करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यात खरिपाचे लागवडीखालील सर्वसाधारण क्षेत्र 3 लाख 86 हजार 973 हेक्टर आहे. यापैकी 2 लाख 14 हजार 342 प्रत्यक्ष हेक्टर म्हणजेच 55.39 टक्के हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.

सातारा जिल्ह्यात प्रामुख्याने भात, ज्वारी, बाजरी, मका, तूर, मूग, उडीद, भुईमूग, सोयाबीन यासह इतर तृणधान्य, कडधान्य, तेलबिया व कापूस आदी पिके जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून केली जातात. जिल्ह्यात उसाची लागवडही मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. उसाच्या पिकासाठी जिल्ह्यात 98 हजार 479 हेक्टर क्षेत्रापैकी 1 लाख 16 हजार 711 हेक्टर क्षेत्रात म्हणजे 119 टक्के क्षेत्रात उसाची लागवड झाली आहे.

यामध्ये जिल्ह्यात भात पिकासाठी 43 हजार 978 हेक्टर क्षेत्रापैकी 28 हजार 477 हेक्टर क्षेत्रात म्हणजे 65 टक्के क्षेत्रात भात पिकाची लागवड करण्यात आली आहे. यामध्ये पाटण तालुक्यात 16 हजार 257 क्षेत्र भात लागवडीचे असले तरी प्रत्यक्षात 13 हजार 720 हेक्टर क्षेत्रावर भाताची पेरणी झाली आहे.

खरीप ज्वारीचे जिल्ह्यात 11 हजार 153 हेक्टर क्षेत्र असून त्यापैकी 7 हजार 185.8 म्हणजेच 64 टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. खरीप ज्वारीचे पाटण तालुक्यात 4 हजार 732 हेक्टर पैकी 4 हजार 620 हेक्टरवर तर कराड तालुक्यात 4 हजार 352 हेक्टरपैकी 2 हजार 402 हेक्टरवर खरीप ज्वारीची पेरणी झाली आहे.

बाजरी पिकासाठी जिल्ह्यात 60 हजार 734 हेक्टर क्षेत्रापैकी 17 हजार 269.5 हेक्टर क्षेत्रात म्हणजे 28 टक्के क्षेत्रात पेरणी झाली आहे, यामध्ये माण तालुक्यात 31 हजार 542 हेक्टर पैकी 11 हजार 914 हेक्टरवर, खटाव तालुक्यात 11 हजार 144 हेक्टरपैकी 1 हजार 178 हेक्टरवर तर फलटण तालुक्यात 7 हजार 122 हेक्टरपैकी 1 हजार 866 हेक्टवर बाजरीची पेरणी झाली आहे.

मका पिकासाठी जिल्ह्यात 15 हजार 190 हेक्टर क्षेत्रापैकी 8 हजार 771.7 हेक्टर क्षेत्रात म्हणजे 58 टक्के क्षेत्रात पेरणी झाली आहे, यामध्ये खटाव तालुक्यात 5 हजार 281 हेक्टर पैकी 3 हजार 632 हेक्टरवर, तर माण तालुक्यात 4 हजार 39 हेक्टरपैकी 2 हजार 119 हेक्टरवर मक्याची पेरणी झाली आहे. तसेच इतर तृण धान्याची जिल्ह्यात 447 हेक्टर क्षेत्रापैकी 227 हेक्टर क्षेत्रात म्हणजे 51 टक्के क्षेत्रात पेरणी झाली आहे, याप्रमाणे एकूण तृण धान्याची जिल्ह्यात 1 लाख 36 हजार 093 हेक्टर क्षेत्रापैकी 65 हजार 587.9 हेक्टर क्षेत्रात म्हणजे 48 टक्के क्षेत्रात तृणधान्याची पेरणी झाली आहे.

जिल्ह्यात तूर पिकासाठी 975 हेक्टर क्षेत्रापैकी 382 हेक्टर क्षेत्रात म्हणजे 39 टक्के क्षेत्रात तूरीची लागवड करण्यात आली आहे, यामध्ये पाटण तालुक्यात 315 क्षेत्र तूर लागवडीचे असले तरी प्रत्यक्षात 244 हेक्टर क्षेत्रावर तूरीची पेरणी झाली आहे, तर खटाव तालुक्यात 254 क्षेत्र तूर लागवडीचे असले तरी प्रत्यक्षात 2 हेक्टर क्षेत्रावर तूरीची पेरणी झाली आहे.

खरीप मुगाची जिल्ह्यात 9 हजार 372 हेक्टर क्षेत्र असून त्यापैकी 5 हजार 820 म्हणजेच 62 टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. मुग पिकाचे खटाव तालुक्यात 6 हजार 275 हेक्टर पैकी 1 हजार 159 हेक्टरवर तर माण तालुक्यात 1 हजार 994 हेक्टरपैकी 3 हजार 885 हेक्टरवर खरीप मुगाची पेरणी झाली आहे.

उडीद पिकासाठी जिल्ह्यात 2 हजार 115 हेक्टर क्षेत्रापैकी 1 हजार 92 हेक्टर क्षेत्रात म्हणजे 52 टक्के क्षेत्रात पेरणी झाली आहे, यामध्ये खटाव तालुक्यात 1 हजार 169 हेक्टर पैकी 573 हेक्टरवर, पाटण तालुक्यात 285 हेक्टरपैकी 283 हेक्टरवर उडीद पिकाची पेरणी झाली आहे.

जिल्ह्यात भुईमुग पिकासाठी 29 हजार 435 हेक्टर क्षेत्रापैकी 24 हजार 650.2 हेक्टर क्षेत्रात म्हणजे 84 टक्के क्षेत्रात भुईमुगाची लागवड करण्यात आली आहे, यामध्ये पाटण तालुक्यात 11 हजार 310 क्षेत्र भुईमुग लागवडीचे असले तरी प्रत्यक्षात 10 हजार 918 हेक्टर क्षेत्रावर, व कराड तालुक्यात 9 हजार 443 क्षेत्रापैकी प्रत्यक्षात 7 हजार 675 हेक्टर क्षेत्रावर, तर सातारा तालुक्यात 3 हजार 799 हेक्टर क्षेत्रापैकी 3 हजार 340 क्षेत्रावर भुईमुगाची पेरणी झाली आहे.

सोयाबीन पिकासाठी जिल्ह्यात 74 हजार 800 हेक्टर क्षेत्रापैकी 74 हजार 452 हेक्टर क्षेत्रात म्हणजे 100 टक्के क्षेत्रात पेरणी झाली आहे, यामध्ये कराड तालुक्यात 17 हजार 584 हेक्टर पैकी 15 हजार 890 हेक्टरवर, सातारा तालुक्यात 21 हजार 246 हेक्टरपैकी 20 हजार 710 हेक्टरवर, पाटण तालुक्यात 8 हजार 896 हेक्टर पैकी 8 हजार 635 हेक्टरवर, तर कोरेगांव तालुक्यात 9 हजार 717 हेक्टरपैकी 7 हजार 636 हेक्टरवर सोयबीनची पेरणी झाली आहे.