कराड प्रतिनिधी : कराड शहरात जादा पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करण्याचे प्रकार वाढत आहेत. त्याला पुरुषांप्रमाणे आता महिलाही बळी पडू लागल्या आहेत. असाच प्रकार कराड शहरात घडला असून एका तरुणाने महिलेला पैशांची गुंतवणूक केल्यास जादा परतावा मिळवून देतो असे सांगत फसवणूक केली आहे.
याबाबत तबस्सूम हमीद शेख (रा. मलकापूर) यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन भास्कर विजय शिर्के, (रा. सातारा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मलकापुरातील तबस्सूम शेख यांनी शेअर मार्केटचे अकाऊंट काढले होते. गुंतवणूक म्हणून त्यांनी त्या अकाऊंटवरुन काही पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवले होते. दरम्यान, काही दिवसांनी तबस्सूम शेख यांच्या यांच्या मोबाईलवर भास्कर शिर्के या व्यक्तीचा फोन आला. त्या व्यक्तीने तबस्सूम यांना शेअर मार्केटमध्ये आणखी गुंतवणूक करणार आहे का? तसेच तुम्ही तुमचे अकाऊंट चालवायला देणार आहे का? अशी विचारणा केली. त्यावेळी तबस्सूम यांनी पैसे गुंतवण्यास होकार दर्शवला. तसेच रक्कम सुरक्षित राहिल का, याची खात्री केली.
भास्कर शिर्के याने त्यांना 5 टक्के परतावा आणि रक्कम सुरक्षित राहिल, असे सांगीतले. त्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेऊन तबस्सूम शेख यांनी आॅनलाईन पद्धतीने ३७ हजार रुपये भास्कर शिर्के याला पाठवले. त्यानंतर तबस्सूम शेख यांना त्यांच्या पैशाची गरज असल्यामुळे त्यांनी भास्कर शिर्के याच्याकडे त्यांच्या पैशाची मागणी केली. मात्र, त्यांना पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याची फिर्याद त्यांनी शहर पोलिसात दिली आहे. सहाय्यक फौजदार रेखा देशपांडे तपास करीत आहेत.