पाटण तालुक्यातील टोळेवाडी रस्त्यावर दरड कोसळली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातीळ महाबळेश्वर, पाटण तालुक्यात अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा देण्याला आला असताना आज पाटण तालुक्यातील टोळेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळल्याची घटना घडली आहे. या ठिकाणी दरड कोसळल्यामुळे या रस्त्याची सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पाहणी करण्यात आली असून या परिसरात आणखी दरड कोसळण्याचा धोका लक्षात घेता हा रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. दरम्यान टोळेवाडीकडे जाण्यासाठी पर्यायी रस्ता असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने देण्यात आलेली आहे.

हवामान विभागाच्यावतीने उद्या सातारा जिल्हयात रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे. दरम्यान पाटण तालुक्यात दुर्गम भागात दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्या त्या ठिकाणी प्रशासनाकडून तत्काळ उपाययोजना आखल्या जात आहेत. सोमवारी पाटण तालुक्यातील टोळेवाडी रस्त्यावर दरड कोसळण्याची घटना घडली. या घटनेमुळे येथील रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला.

दरम्यान, या ठिकाणी पाटणच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या वतीने भेट देण्यात आली. पश्चिमेकडील तालुक्यातील विशेषत: पाटण, महाबळेश्वर, वाई, जावली व सातारा या तालुक्यामध्ये तसेच उर्वरित तालुक्यामधील ज्या गावांमध्ये संभाव्य भूस्खलन, दरडी कोसळून धोका निर्माण होऊ शकतो अशा ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना स्थानिक प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सुरक्षित स्थळी हलवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिल्या आहेत.

धोका टाळण्यासाठी जिल्ह्याधिकाऱ्यांकडून आदेश

जिल्हाधिकारी डुडी यांनी महसूल विभागातील अधिकाऱ्यांशी नुकताच संवाद असधला. यावेळी ते म्हणाले की, अतिवृष्टीमुळे संभाव्य भूस्खलन/ दरडी कोसळून धोका निर्माण होण्याची शक्यता असते. अशा गावांमधील नागरिकांना आगाऊ सूचना देऊन तातडीने सुरक्षितस्थळी हलविण्याची कार्यवाही करण्याची जबाबदारी हि संबंधित गावचे मंडलाधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील व कोतवाल यांची आहे. यामध्ये हलगर्जीपणा अथवा टाळाटाळ झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित अधिकाऱ्यांविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये कठोर कारवाई केली जाईल याची गांभीर्याने नोंद घ्यावी, असे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.