पाटण प्रतिनिधी | पाटण तालुक्यातील विहे येथील चव्हाण मळा शिवारातील २५ एकरांवरील ऊस आग लागून जळाला. यात सुमारे ४० लाखांचे नुकसान झाले आहे. गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून प्रशासनाकडून पंचनामे सुरू करण्या आले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, विहे (ता. पाटण) येथील जुने विहे येथील जुना साजूर रस्त्यावर तांबी नावाच्या शिवारात चव्हाण मळ्याजवळ गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास उसाला अचानक आग लागली. यात २५ एकरांवरील ऊस जळाला.
यात विजयसिंह पाटील, शेखर पाटील, राहुल पाटील, राजेंद्र साळुंखे, राहुल संकपाळ, विक्रम पाटील, मिथुन पाटील आदी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. आसपासच्या शेतकरी व नागरिकांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीचा भडका मोठा असल्याने अग्निशमन दलाला बोलावण्यात आले.
रस्त्यापासून ऊस क्षेत्र लांब असल्यामुळे अग्निशमन दल त्या ठिकाणी पोचू शकले नाही. त्यानंतर दोन्ही रानाच्या मध्ये उभ्या पिकात रोटर मारून आग आटोक्यात आणण्यात आली. घटनास्थळी जळालेल्या उसाचे पंचनामे तलाठीकडून सुरू करण्यात आले असून, जळालेल्या क्षेत्राचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.