पाटणमध्ये 40 वर्षाच्या व्यक्तीची धारदार शस्त्राने वार करून हत्या; स्मशानभूमीत आढळला मृतदेह

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी | कराडमध्ये कार्वे नाका येथील भर चौकात शस्त्राने सपासप वार करून तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच पाटणमध्येही एकाचा अज्ञाताने शस्त्राने वार करून खून केल्याची घटना समोर आली आहे. प्रकाश परशुराम पवार (मानेवाडी, सातारा), असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

पाटणमध्ये ही थरारक घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे. खून झाल्यानंतर संबधित व्यक्तीचा मृतदेह हा रक्ताच्या थारोळ्यात रात्रभर स्मशानभूमीत पडून होता. सदर मृतदेह सकाळी स्मशान भूमीच्या परिसरात गेलेल्या नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी पोलिसांना तात्काळ याची माहिती दिली. त्यानंतर खुनाचा प्रकार उघडकीस आला.

खून झालेली व्यक्ती साताऱ्यातील

पाटण शहरातील चाफोली रोड परिसरात असलेल्या बीएसएनएल कार्यालयासमोरील स्मशानभूमीमध्ये रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह आढळून आला. अज्ञाताने धारधार शस्त्राने डोक्यात, कपाळावर आणि उजव्या कानावर वार करून ही हत्या केली आहे. खून झालेली व्यक्ती कातकरी समाजातील तसेच मूळची मानेवाडी, सातारा येथील आहे. सासरवाडी असलेल्या पाटणमध्ये तो राहत होता.

संशयिताच्या शोधार्थ पोलीस पथके रवाना

याप्रकरणी संतोष चंद्रकांत पवार यांनी पाटण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञातावर खुनाचा गुन्हा नोंद झाला आहे. संशयिताच्या शोधार्थ पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. या घटनेमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. संशयिताला ताब्यात घेतल्यानंतरच हत्येमागील कारणाचा उलगडा होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.

भंगार विक्री करून करायचा उदरनिर्वाह

खून झालेली व्यक्ती आणि त्याचा मुलगा असे दोघेजण पाटणमध्ये राहून भंगार गोळा करून विक्री करायचे. त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालायचा. मृतदेहाचा पंचनामा करून पाटण ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कामत हे या गुन्ह्याचा तपास करत आहेत.