सातारा प्रतिनिधी । खंडाळा तालुक्यातील शिरवळ-नायगाव रोडवरील सांगवी गावच्या हद्दीत भरधाव जीपच्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना खंडाळा तालुक्यात घडली. यानंतर जीप चालकाने रस्त्याच्या कडेला लावलेल्या पाच दुचाकींना देखील धडक देत नुकसान केले. या अपघातात नौशाद मुस्तफा अन्सारी (वय ३८) जागीच ठार झाले. ते सध्या शिरवळ तालुक्यात राहत असून, मूळ बिहारच्या सिवान येथील रहिवाशी होते.
याबाबत ऐहिक माहिती अशी की, नौशाद हे धनगरवाडी येथील एका कंपनीमध्ये क्रेन ऑपरेटर म्हणून कार्यरत होते. ते आपल्या दुचाकी क्रमांक (केएल-५८-एजी-८४०३)वरुन भाजी मंडईतून खरेदी करून चौपाळा येथील मशिदीमध्ये निघाले होते. तेवढ्यात शिरवळ बाजूकडून भरधाव वेगाने आलेल्या जीप क्रमांक (एमएच-११-सीजी-०६७०) चालकाने नौशाद यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
या धडकेत ते जागीच ठार झाले.शिरवळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. याप्रकरणी मोहम्मद अन्सारी याने शिरवळ पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून पोलीस अंमलदार प्रशांत धुमाळ अधिक तपास करीत आहेत.