पाटण प्रतिनिधी । राष्ट्रीय पातळीवर आदर्श ठरलेल्या पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी येथील महिलांना जमिनीच्या सातबारावर पुरुषांबरोबरीचे स्थान देण्यात आले. लक्ष्मी मुक्ती योजनेच्या माध्यमातून महिला दिनी महिलांना तशीलदार अनंत गुरव व पाटणचे उपविभागीय अधिकारी सोपान टोम्पे यांच्या हस्ते सातबारा दाखल्यांचे वाटप करण्यात आले.
महिला दिनाचे औचित्य साधून नव्या जमीनदार झालेल्या महिलांना फेरफारचे वाटप करुन महिलांचा सन्मान करणारा हा सोहळा मान्याचीवाडी गावात पार पडला. यावेळी पाटणचे उपविभागीय अधिकारी सोपान टोम्पे, तहसीलदार अनंत गुरव, मंडल अधिकारी देशमुख, तलाठी राजश्री पवार, सरपंच रवींद्र माने, दिलीप गुंजाळकर, उत्तमराव माने, अधिकराव माने, विठ्ठल माने, पोलिस पाटील विकास माने, दादासाहेब माने, लता आसळकर, सीमा माने, निर्मला पाचुपते, मनीषा माने यांची प्रमुख उपस्थिती होती.
देशपातळीवर सर्वोत्तम ग्रामपंचायत ठरल्यानंतर मान्याचीवाडी गावाला पंधरा दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी भेट दिली होती. त्यावेळी या गावाने लक्ष्मी मुक्ती योजनेमध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले होते. त्यानंतर येथील ग्रामस्थांनी विशेष ग्रामसभा आयोजित करून गावातील सर्व खातेदारांना लक्ष्मी मुक्ती योजनेबाबत माहिती दिली. सर्वच खातेदारांनी आपल्या जमिनीच्या हिश्यात सह खातेदार म्हणून लक्ष्मी मुक्ती योजने अंतर्गत पत्नीची नोंद करण्याबाबत संमती दर्शवली. त्यानुसार या गावात जागतिक महिला दिनानिमित्त पहिल्या 20 लाभार्थी महिलांना फेरफारचे वाटप करण्यात आले. तसेच जिर्ण झालेल्या रेशन कार्डचे नव्याने वाटप करण्यात आले. अंत्योदय योजनेतील महिलांना साड्यांचेही वाटप करण्यात आले.
यावेळी तहसीलदार अनंत गुरव यांनीही गावातील उपक्रमांत असलेला महिलांचा सहभाग व योगदानाबद्दल कौतुक केले. प्रास्ताविक सरपंच रवींद्र माने यांनी केले. स्वागत वंदना पाचुपते यांनी केले. दिलीप गुंजाळकर यांनी आभार मानले.