पाटण प्रतिनिधी | महाराष्ट्रात गेमचेंजर ठरलेल्या लाडकी बहीण योजनेच्या नियमाची व निकषांची राज्य शासनाने काटेकोरपणे अंमलबजावणी सुरु केल्यामुळे या योजनेतून पाटण तालुक्यातील सुमारे पाच हजार महिला या योजनेतून अपात्र ठरल्या आहेत. या योजनेतून पात्र महिलांना दरमहा आर्थिक मदत दिली जाते. विशेष म्हणजे राज्याचे पर्यंतमंत्री तथा
गेल्या वर्षी महायुती सरकारने महिलांसाठी मोठा गाजावाजा करत लाडकी बहीण योजना सुरु केली. दर महिन्याला महिलांच्या बँक खात्यावर १,५०० रूपये देऊन महिला सक्षमीकरण करायला प्राधान्य शासनाने दिले आहे. या योजनेत सामील होण्यासाठी काही अटी व शर्ती शासनाने घातल्या होत्या. या अटी व शर्तींची काटेकोरपणे अंमलबजावणी न झाल्यामुळे शासनाने घातलेले निकष पूर्ण न केलेल्या महिलांनी या योजनेचा फायदा घेतला.
आता शासनाने या योजनेसाठी घातलेल्या अटी व निकषांची कडक अंमलबजावणी करायला सुरवात केली आहे. याची जबाबदारी एकात्मिक बालविकास प्रकल्पावर देण्यात आली आहे. एकात्मिक बालविकास प्रकल्पाने सर्वेक्षण करून याबाबतचा आपला अहवाल शासन दरबारी दिला आहे. या अहवालात पाटण तालुक्यातून 5 हजार महिलांना या योजनेतून अपात्र ठरविण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे.
या नियम व निकषांनुसार ६५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. ज्या महिला इतर शासकीय योजनांचा लाभ घेत आहेत, त्यांना या योजनेतून अपात्र ठरवण्यात आले आहे. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असल्यास किंवा कुटुंबाच्या नावावर चारचाकी वाहन असल्यास महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे.
अपात्र ठरलेल्या महिलांना यापुढे योजनेचा लाभ मिळणार नाही. मागील हप्त्यांचे पैसे परत घेण्याचा शासनाचा कोणताही मानस नाही. महिला व बालविकास विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा स्थानिक कार्यालयात संपर्क करून महिलांनी त्यांच्या अर्जाची स्थिती तपासावी, तसेच आवश्यक असल्यास त्यांच्या अर्जाच्या पुनर्विलोकनासाठी त्या विनंती करू शकतात, अपात्र ठरलेल्या महिलांनी स्थानिक महिला व बालविकास विभागाशी संपर्क साधून अधिक माहितीसाठी विचारणा करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.