कोयता हल्ल्यातील जखमी महिलेचा मृत्यू; आगाशिवनगरमध्ये झाला होता हल्ला

0
1476
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | मलकापूर – आगाशिवनगर येथील दांगटवस्तीमध्ये प्रेमसंबंधाच्या कारणावरून महिलेवर संशयिताने कोयत्याने हल्ला केला होता. त्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा काल रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या संशयितावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवींद्र सुभाष पवार (वय ३५, रा. दांगट वस्ती, आगाशिवनगर) असेगुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव असल्याची माहिती शहर पोलिसांनी दिली.

मलकापूर – आगाशिवनगर येथील महिलेचे रवींद्र पवार याच्याशी प्रेमसंबंध होते. गुरुवारी (ता. १३) रवींद्र संबंधित महिलेच्या घरी गेला होता. त्या वेळी त्यांच्यात वाद झाला.

वादावेळी चिडून जाऊन रवींद्र याने स्वतःसोबत आणलेल्या कोयत्याने महिलेवर वार केले. त्यामध्ये गंभीर जखमी होऊन संबंधित महिला रक्ताच्या थारोळ्यात पडली. त्यानंतर हल्लेखोर रवींद्र पवार याने तेथून पळ काढला. संबंधित संशयितास वहागाव परिसरातून ताब्यात घेतले. दरम्यान, कोयता हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. ती गंभीर जखमी झाल्याने तिची प्रकृती चिंताजनक होती. अखेर उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. त्यामुळे पोलिसांनी संशयितावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.