कराड प्रतिनिधी | महिलेवर कोयत्याने हल्ला झाल्याची घटना मलकापूर येथील आगाशिवनगर परिसरातील दांगट वस्तीत गुरूवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली. अनिता बापू सातपुते (वय ३०) असे जखमी महिलेचे नाव आहे. तिच्यावर खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. जास्त रक्तस्राव झाल्याने तिची प्रकृती गंभीर आहे.
रवींद्र सुभाष पवार (वय ३५, रा. दांगट वस्ती) असे हल्लेखोराचे नाव असून, हल्ला केल्यानंतर तो पसार झाला आहे. तीन पथकाद्वारे पोलिस त्याचा शोध घेत आहेत. संबंधित महिलेचे वडील बापू सातपुते यांनी शहर पोलिसांत फिर्याद पोलिसात दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अनिताचा विवाह झाला आहे. मात्र, नवऱ्याला सोडून ती दांगटवस्ती येथे आई-वडिलांकडे राहण्यास आहे. तिला तीन मुले आहेत. रवींद्र याच्याशी पूर्वीचाच परिचय आहे. दुपारी रवींद्र तिच्या घरी गेला होता. त्यांच्यात बोलणेही झाले. त्यानंतर रवींद्रने अनितावर कोयत्याने वार केला. तो तिच्या कानापासून जबड्यापर्यंत गेला आहे. त्यामुळे तिच्या जबड्याला गंभीर जखम झाली आहे.
हल्लेखोर रवींद्र तेथून पळून गेला आहे. त्याचा पोलिस शोध घेत आहेत. घटनास्थळी पोलिस उपअधीक्षक अमोल ठाकूर, पोलिस निरीक्षक राजू ताशिलदार यांनी भेट देऊन पाहणी केली आहे. घटनास्थळचा पंचनामाही केला आहे. अनिताची प्रकृती गंभीर आहे, असे रुग्णालयातून सांगण्यात आले.