तिसऱ्या दिवशी मृत महिलेच्या हाताचे सापडले अवशेष; इतर अवयवांच्या शोधासाठी 15 एकरहून अधिक परिसरात ऊसतोड

0
119

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्याला हादरवून टाकणारी घटना फलटण तालुक्यातील विडणी गावात गत आठवड्यात उघडकीस आली. विडणीत ऊसाच्या शिवारात अंधश्रद्धेतून महिलेचा निघृण खून करण्यात आला. या निर्घृण खुनाच्या घटनेचा तपास पोलिसांकडून सुरू असून तिसऱ्या दिवशी या ठिकाणी मृत महिलेच्या हाताचे अवशेष सापडले आहेत. नैवेद्य म्हणून चारही दिशेला मृतदेहाचे चार तुकडे टाकले असावेत, असा संशय व्यक्त केला जात आहे. मृतदेहाचा उर्वरित भाग अद्यापही सापडत नसल्याने ते शोधण्याचे तसेच खुनाचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. अवयव शोधण्यास अडथळा येऊ नये यासाठी घटनास्थळापासून ५०० मीटर परिसरात ऊसतोड कामगार, शेत मालकांशिवाय इतरांना प्रवेश बंदी पोलिसांनी केली असून कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.

फलटण तालुक्यातील विडणी येथील २५ फाटा परिसरात प्रदीप जाधव यांचे उसाचे शेत आहे. निर्मनुष्य ठिकाणी काही दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तीने एका महिलेचा खून करून मृतदेह उसाच्या शेतात टाकून फरार झाला आहे. संबंधित मृतदेह अर्धवट तसेच सडलेला आहे. हिंस्र प्राण्यांनी कबरेपासून सडलेला भाग उसाच्या शेतातून बाहेर ओढून आणला तेव्हा शुक्रवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला.

मृतदेहाचे अवशेष वैद्यकीय तपासणीसाठी

दरम्यान, घटनास्थळी तीन दिवसांपासून पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्यासह पोलिस उपअधीक्षक राहुल धस, पोलिस निरीक्षक सुनील महाडीक यांच्याकडून शोधकार्य केले जात आहे. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची फौज कसून तपास करत आहे सापडलेल्या मृतदेहाचे अवशेष वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

१५ एकराहून अधिक ऊस तोडण्यात आला

दरम्यान महिलेच्या शरीराचा कवटी व कमरेखालचा भाग व आता हात सापडला असला तरी उर्वरित भाग अद्यापही सापडत नसल्याने व घटनास्थळाच्या परिसरातील सुमारे १५ एकराहून अधिक ऊस तोडण्यात आला आहे. मात्र याबाबत पोलीस यंत्रणेच्या हाती आरोपी व ठोस पुरावा सापडत नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.

गुलाल अन् कापलेले काळे केस…

ज्या ठिकाणी महिलेचा मृतदेह आढळून आला त्या ऊसाच्या शेतात काही अंतरावर नारळ, गुलाल, महिलेचे केस कापलेले, तेलाचा दिवा, काळी बाहुली, सुरी आढळून आली. त्यामुळे हा प्रकार नरबळी असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.