राज्य सरकारच्या अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापनेच्या ‘त्या’ जीआरचं झालं काय? विडणीतील महिला हत्या प्रकरणावर डॉ. हमीद दाभोळकरांचा सवाल

0
20

सातारा प्रतिनिधी । संतोष गुरव

सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील विडणी गावात काल शुक्रवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास अंधश्रद्धेतून एका महिलेची हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. विडणी गाव परिसरातील पंचवीस फाटा जवळील ऊसाच्या शेतात या महिलेचा शीर धडापासून वेगळे केलेला मृतदेह आढळून आला. या घटनेनंतर आरोपीचा शोध घेण्यात काम पोलीस करत आहेत. या दरम्यान, आता अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. हमीद दाभोळकर यांनी महत्वाचा प्रश्न उपस्थित केला आहे. अंनिसने केलेल्या मागणीनुसार राज्य सरकारने राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात ‘अंधश्रध्दा निर्मूलन कक्ष’ स्थापन करण्याचा आदेश काढलेला होता. त्या आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसत असून त्याची अंमलबजावणी करण्यात यावी जेणे करून विडणीतील नरबळीसारखे प्रकारे घडणार नसल्याची प्रतिक्रिया डॉ. दाभोलकर यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ला दिली आहे.

फलटण येथील महिलेच्या खून प्रकरणाच्या घटनेनंतर अंनिसचे डॉ. हमीद दाभोळकर यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’शी संवाद साधला. यावेळी डॉ. दाभोलकर यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, फलटण तालुक्यतील विडणी गावातील पंचवीस फाटा जवळील ऊसाच्या शेतात एका महिलेचा मृतदेह आढळून आला. या मृतदेहाशेजारी नारळ, कुंकू, लिंबू, मिरची, काळी भाउली, काळे केस अशा वस्तू आढळून आलेल्या आहेत. ज्यावेळेला अशा प्रकारच्या गोष्टी सापडतात त्यावेळेला नरबळीची शक्यता असू शकते.

सातारा जिल्ह्यात गेल्या महिनाभरात अंधश्रद्धेचे आणि खास करून अघोरी अशा अंधश्रद्धेचे प्रकार घडल्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे फलटण येथील घटनेमागे अंधश्रद्धेची तर काही बाजू नाही ना या दृष्ठीने तपास करणे गरजेचे आहे. महाराष्ट्र सरकारने अशा एक जीआर काढलेला आहे कि प्रत्येक पोलीस ठाण्यात अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन करावा. या जीआरची अंमलबजावणी अजूनही महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात झालेली नाही. जिल्ह्यतील तालुक्याच्या प्रत्येक पोलीस ठाण्यात जर अंधश्रद्धा निर्मूलन कक्षची स्थापना आणि जादूटोणा विरोधी कायद्याची कडक अंमलबजावणी करावी, अशी मागणी डॉ. दाभोलकर यांनी केली आहे.

काय आहे ‘अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष’ स्थापनेचा आदेश

महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये जादूटोणाविरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ‘अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष’ स्थापन करावेत असा आदेश पोलीस महासंचालक कार्यालयाने 19 जुलै 2024 रोजी काढला आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य कमिटीने एक प्रसिद्धी पत्रक काढले. राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. छेरिंग दोरजे यांच्या सहीने असलेल्या आदेशात म्हटलं आहे की, ‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा, जादुटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत तसंच त्याचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम २०१३’ च्या कलम ५ (१) अन्वये, महाराष्ट्र शासनास प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन, महाराष्ट्र शासन, सदर अधिनियमातील कलम ५ (२) मध्ये सांगितलेल्या कामगिरीसाठी पोलीस आयुक्तांच्या कार्यक्षेत्रात सहाय्यक आयुक्त (गुन्हे), तसंच पोलीस अधीक्षकांच्या कार्यक्षेत्रात पोलीस निरीक्षक (स्थानिक गुन्हे शाखा) यांची दक्षता अधिकारी म्हणून नियुक्ती करण्याच्या तसंच, शासन पत्र, गृहविभाग, क्र. अधिनियम ०७५१/प्र.क्र.३२४/विशा-६, दि.१८/०३/२०१६ मध्ये नमुद केल्यानुसार ‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट आणि अघोरी प्रथा तसंच जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत अधिनियम २०१३ च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये एक कक्ष स्थापन करण्याच्या सूचना संबंधित अधिकार्‍यांना देत आहे.’ पोलीस महासंचालक कार्यालयाकडून हे आदेश सर्व पोलीस आयुक्त, सर्व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना पाठवले गेले आहेत. मात्र, त्याची अंलबजावणी अजून किती झाली आहे हा संशोधनाचा विषय आहे.

फलटण तालुक्यातील विडणीत नेमकं घडलं काय?

फलटण तालुक्यातील विडणी येथील २५ फाटा परिसरात प्रदीप जाधव यांचे उसाचे शेत आहे. निर्मनुष्य ठिकाणी काही दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तीने एका महिलेचा खून करून मृतदेह उसाच्या शेतात टाकून फरार झाला असावा अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. संबंधित मृतदेह अर्धवट तसेच सडलेला आहे. हिंस्र प्राण्यांनी कबरेपासून सडलेला भाग उसाच्या शेतातून बाहेर ओढून आणला. तेव्हा शुक्रवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला.