सातारा प्रतिनिधी । खंडाळा तालुक्यातील लोणंद येथे घरात घुसून दिव्यांग महिलेच्या गळ्यातील पाऊण तोळ्याचे मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेला लोणंद पोलिसांनी नुकतीच अटक केली.
अंजली शेखर घोडके (रा. लोणंद) असे संशयित महिलेचे नाव या माहिलेकडून चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे. लोणंद येथील मनोज शरद घुले यांच्या घरामध्ये घुसून संशयित अंजली घोडके या महिलेने दिव्यांग असलेल्या मनोज यांच्या आई प्रेमा घघुले यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून चोरून नेले होते.
याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर सपोनि सुशील भोसले व गुन्हे प्रकटीकरण शाखेने तपासाला सुरूवात केली. गोपनीय माहितीद्वारे पोलिसांना अंजली घोडके या महिलेने चोरी केल्याचे समजले. त्यावरून तिला ताब्यात घेऊन तिच्याकडे चौकशी केली असता ही चोरी तिनेच केल्याचे कबुल केले. घोडके हिच्याकडून चोरी केलेले मंगळसूत्र जप्त करण्यात आले आहे. या कारवाईत हवालदार संतोष नाळे, सर्जेराव सुळ, विठ्ठल काळे, अभिजित घनवट, अमोल जाधव, शुभांगी धायगुडे, आशा शेळके यांनी सहभाग घेतला.