कराड प्रतिनिधी । मावळत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी अवघे काही तासच बाकी राहिले आहेत. या नववर्षाचे स्वागत करण्यासाठी परमिट रूम, बिअर बारला पहाटेपर्यंत परवानगी दिली आहे. काही ठिकाणी कॉकटेल पार्टीचे देखील आयोजन करण्यात आले असून परंतु नववर्षाच्या स्वागताला उत्साह आणि जल्लोषाच्या भरात गालबोट लागू नये म्हणून पोलिस दल सज्ज आहे. हुल्लडबाजांवर कारवाई करण्यासाठी आणि ‘ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह’च्या कारवायांसाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात असणार आहे.
नववर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेक खासगी ठिकाणी पार्टीचे आयोजन केले जाते. काही मित्रमंडळी एकत्र येऊन टेरेसवर पार्टी करतात. अनेकांनी हॉटेल्स, ढाबे, खानावळींत आगाऊ बुकिंग केले आहे. यंदाही थर्टी फर्स्टला मध्यरात्री एकपर्यंत मद्यविक्री सुरू राहणार आहे. तर परमिट रूम, बिअरबार पहाटे पाच वाजेपर्यंत खुले राहणार आहेत.
उत्साहाच्या भरात अनेकजण दुचाकी, चारचाकी वाहने वेगाने पळवतात; परंतु या नादात अनेकदा अपघाताची भीती असते. त्यामुळे पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारला जातो. त्यामुळे जल्लोष करताना कोणाला त्रास होणार नाही, याचे भान ठेवण्याची गरज आहे.
३१ म्हणजे समाजकंटकांना मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळविण्याची संधी
३१ डिसेंबर रोजी गतवर्षास निरोप व १ जानेवारी २०२५ नवीन वर्षाचे स्वागत संपूर्ण सातारा जिल्ह्यात उत्साहात व जल्लोषात साजरे केले जाते. यावेळी मोठ्या प्रमाणावर लोक एकत्र येतात याचाच फायदा घेऊन काही समाजविघातक/देशविघातक/समाजकंटक व्यक्तींच्याकडून हिंसा तसेच आतंकवादी कारवाया केल्या जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामधून समाजकंटकांना मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळविण्याची संधी उपलब्ध होते. सदरवेळी समाजकंटकांकडून जातीय सलोखा बिघडविण्यासाठी विविध समाजमाध्यमांचा वापर केला जातो. तसेच मोठ्या प्रमाणावर हिंसात्मक कारवाई करण्यासाठी, तरूणांचा वापर करण्यासाठी समाजमाध्यमांचा वापर केला जातो.
पोलिसांकडून बारकाईने नजर ठेवली जाणार
नवीन वर्षाचे स्वागत जल्लोषात व उत्साहात साजरे करीत असताना कोणताही अनुचित प्रकार अगर अप्रिय घटना घडू नये याकरीता सातारा जिल्हा पोलीस दलाकडून एकूण ९७ पोलीस अधिकारी, १३०३ पोलीस अंमलदार आणि ५०० गृहरक्षक नेमण्यात आले आहेत. प्रत्येक पोलीस ठाणेकडील वाहतूक कर्मचाऱ्यांकडे मद्यपी वाहनचालक यांची तपासणी करण्याकरीता ३३ ब्रीथ अॅनालायझर मशिन्स देण्यात आलेल्या आहेत. तसेच समाजमाध्यमांचा वापर करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला जाऊ नये म्हणून पोलीस दलाकडून समाजमाध्यमांवर बारकाईने नजर ठेवली जाणार आहे.
गर्दीच्या ठिकाणी निर्भया पथकाद्वारे ठेवले जाणार लक्ष
सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील गर्दीच्या, बाजारपेठांच्या, सार्वजनिक महत्वाच्या ठिकाणी सक्त नाकाबंदी नेमण्यात येणार असून पेट्रोलींग, कोंबींग ऑपरेशन तसेच सातारा जिल्ह्याचे हद्दीवर चेक पोस्ट नेमून वाहनांची पडताळणी/तपासणी करण्यात येणार आहे. ध्वनी प्रदूषण कायद्यातील तरतूदीनुसार ध्वनी पातळी नियंत्रित रहावी याकरीता ध्वनीक्षेपक/डॉल्बी/साऊंड सिस्टीम यांचेवर ध्वनीक्षेपण उपकरणांचा वापर करून ध्वनी प्रदूषण होत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे. गर्दीच्या ठिकाणी कार्यक्रमाच्यावेळी मोठया प्रमाणात महिला/तरूणी सहभागी होत असतात अशावेळी महिलांची/तरूणींची छेडछाड अगर गैरकृत्य होणार नाही याकरीता छेडछाड / गैरकृत्य करणा-या इसमांवर निर्भया पथकाद्वारे कडक कारवाई करण्यात येणार आहे. काही मद्यपी/अंमली पदार्थांचे सेवन करणारे ऐतिहासिक/सार्वजनिक ठिकाणी हुल्लडबाजी करतात त्यांचेवर देखील कारवाई करण्यात येणार आहे.
मद्यपींमुळे इतरांच्या जीवाला धोका
दारूच्या नशेत वाहन चालवल्यामुळे स्वतःच्या आणि इतरांच्या जीवाला देखील धोका होऊ शकतो. यापूर्वी नशेत वाहन चालवल्यामुळे अनेक अपघात झाले आहेत. त्यामुळे स्वतःच्या आणि इतरांच्या जीवाला धोका होणार नाही, याची काळजी घ्यावी.
दारू कोण पिले, ब्रेथ अॅनालायझरने तपासणार
- दारुच्या नशेत वाहन चालवणे हा मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार गुन्हा आहे.
- नशेत वाहन चालवल्यामुळे अपघात होऊ नये म्हणून नाकाबंदी केली जाईल.
- वाहतूक पोलिस आणि पोलिस ठाण्यांकडे ब्रेथ अॅनालायझर मशीन दिली आहेत.
हॉटेल, ढाबे फुल्ल; पार्किंग पुरेना!
काही उत्साही मंडळीनी हॉटेल, ढाबे येथे आगाऊ बुकिंग केले आहे. हॉटेल, ढाबेचालकांनी विद्युतरोषणाई करून आकर्षक सवलती जाहीर केल्या आहेत; तसेच पार्किंगसाठी स्वतंत्र व्यवस्थाही केली आहे.
तळीरामांनो, दंडाची रक्कम माहितीय का?
दारू पिऊन वाहन चालवत असल्याचे ब्रेथ अॅनालायझर मशीनद्वारे निष्पन्न झाल्यास पोलिसांकडून चालकावर कारवाई केली जाते. त्यांच्याकडून थेट न्यायालयात खटला पाठवला जातो. तेथे दोन हजारांपासून पुढे दंडात्मकं कारवाई केली जाते.
मद्यविक्रीस रात्री एकपर्यंत परवानगी
३१ डिसेंबरला मध्यरात्री एक वाजेपर्यंत वाइन शॉपमधून- मद्यविक्रीसाठी परवानगी देण्यात आली आहे. तर पहाटे पाच वाजेपर्यंत परमिट रूम, बिअर बार सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षकांनी केलं आवाहन
जिल्ह्यातील पाचगणी, महाबळेश्वर, कास पठार, तापोळा, बामणोली व इतर पर्यटनस्थळी बरेचशे पर्यटक ३१ डिसेंबर साजरा करण्यासाठी येत असतात. सदर ठिकाणी सुद्धा पोलीस बंदोबस्ताचे योग्य नियोजन करून हुल्लडबाजांवर कारवाई करण्यात येणार आहे. याकरीता जिल्हा पोलीस अधीक्षक मा. श्री. समीर शेख यांनी सदरचा जुन्या वर्षाचा निरोप व नवीन वर्षाचे स्वागताचा उत्सव उत्साहात, जल्लोषात, शांततेत व सौहार्दपूर्ण वातावरणात साजरा करण्याचे व हा उत्सव साजरा करताना कोणीही हुल्लडबाजी करू नये असे आवाहन केले आहे.