पाटण प्रतिनिधी | कोयना धरण पाणलोट क्षेत्रात आज पावसाने कमी हजेरी लावली. मात्र, सायंकाळी पाच वाजल्यानंतर पावसाचा जोर पुन्हा वाढल्यामुळ कोयना धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढली आहे. शुक्रवारी रात्री आठ वाजता आलेल्या आकडेवारीनुसार कोयना धरणामध्ये ८२.०१ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.
आज सायंकाळी पावसाचा जोर पुन्हा वाढल्याने धरणातुन कोयना नदीत उद्या शनिवारी सकाळी ९ वाजता १० हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असून नदीपात्रात ४० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग होणार आहे. त्यामुळे कृष्णा-कोयना नदीकाठी पुन्हा धोका वाढणार आहे.
कोयना धरण पाणलोट क्षेत्रात आठवड्यापासून मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे कोयना धरणाच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. कोयना धरणात पाण्याची आवक वाढल्याने पावसाळ्यात पहिल्यांदाच गुरुवारी सायंकाळी ५ वाजता धऱणाचे सहा वक्र दरवाजे उचलुन १० हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले.
त्यानंतर रात्री सात वाजता पुन्हा १० हजार क्युसेकने वाढ करुन नदीत २० हजार क्युकेस सोडण्यात आले. कोयना धऱणातील पाण्याची आवक ८५ हजार क्येसकवर होती. त्यामुळे धरणातील पाणी पातळी वाढतच चालली होती. त्यामुळे आज शुक्रवारी सकाळी सात वाजता धरणातुन पाणी सोडण्याच्या क्षमतेते वाढ करुन आणखी १० हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. कोयना नदीपात्रात ४२ हजार १०० क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे.