पाटण प्रतिनिधी । गेल्या दोन आठवड्यापासून पाटण तालुक्यात मुसळधार पाऊस पडत त्यामुळे कोयना, केरा, काजळी, काफनासह सर्वच नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पाटण तालुक्यातील अनेक पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहे. दरम्यान, आज कोयना धरण पाणलोट क्षेत्रात कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने दुपारी विश्रांती घेतली. पावसाचा जोर कमी झाल्याने कोयना धरणातील पाणी साठ्यात येणाऱ्या पाण्याची आवकही कमी झाली आहे. त्यामुळे धरणातून कोयना नदीत होणारा ३० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग स्थिर आहे. सायंकाळी पाच वाजता आलेल्या आकडेवारीनुसार कोयना धरणात 81.64 टीएमसी इतका पाणीसाठा झाला असून धरण 77.57 टक्के भरले आहे.
सातारा जिल्ह्यात रेड अलर्ट देण्यात आला असून एनडीआरएफचे पथक सातारा जिल्ह्यातील पुरस्थिती उध्दभवणाऱ्या नदीकाठच्या गावावर तसेच दरडी कोसळणाऱ्या डोंगराळ भागात लक्ष ठेऊन आहेत. नैसर्गिक आपत्ती उध्दभवणाऱ्या ठिकाणी असलेल्या ग्रामस्थांना यापूर्वीच जिल्हा प्रशासनाकडून स्थलांतरित करण्यात आलेले आहे. सातारा तालुक्यातील मोरेवाडी व भैरवगड तसेच पाटण तालुकयातील ज्योतिबाचीवाडी तसेच म्हारवड या चार गावातील १६७ कुटुंबातील ५१४ जणांचे जिल्हा प्रशासनाकडून सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे.
दरम्यान, पावसामुळे कोयना धरणात आतापर्यंत 57 हजार 917 क्युसेक पाण्याची आवक झाली असून 32,100 क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात करण्यात आलेला आहे. आज दिवसभर पावसाची संततधार असल्यामुळे कोयनेला 35, नवजाला 31 तर महाबळेश्वरला 40 मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.
NDRF पथकाकडून नदीकाठच्या गावाची पाहणी
कराड आणि पाटण तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे तसेच कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग केला जात असल्याने नदीकाठच्या गावांना पुराचा धोका बसण्याची शक्यता लक्षात घेता NDRF टीमने कराड तालुकयातील काही गावांची पाहणी केली. यामध्ये आज सकाळी तांबवे गावात जाऊन NDRF च्या जवानांनी ग्रामस्थांशी चर्चा केली आणि नदीकाठची पाहणी केली. तसेच कराड शहरात देखीलप्रीतिसंगम घाटावर जाऊन पाहणी करीत तेथील स्थितीचा आढावा घेतला.
जिल्ह्यात सरासरी 43.9 मि.मी. पाऊस
सातारा जिल्ह्यात दि. 25 जुलै रोजी सरासरी 43.9 मि.मी. पावसाची नोंद झाली असून 1 जूनपासून आतापर्यंत एकूण सरासरी 636.5 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. सर्व आकडे मि.मी.मध्ये असून कंसातील आकडे आतापर्यंतच्या एकूण पावसाचे आहेत. सातारा – 48.2 (568.6), जावली-मेढा – 99.0 (1110.1), पाटण – 40.7 (942.3), कराड –26.9 (583.1), कोरेगाव –46.8 (484.2), खटाव – वडूज – 23.1 (371.0), माण – दहिवडी – 12.8 (288.4), फलटण – 20.2 (319), खंडाळा – 31.7 (260.3), वाई – 61.7 (577.2), महाबळेश्वर – 142.0 (2206.2) या प्रमाणे पाऊस झाला आहे.
Koyna Dam
Date: 26/07/2024
Time: 05:00 PM
Water level: 2143’00” (653.186m)
Dam Storage:
Gross: 81.64 TMC (77.57%)
Live: 76.52 TMC (76.42%)
Inflow : 57,917 Cusecs.
Discharges
Radial Gate: 30,000 Cusecs.
KDPH: 2100 Cusecs.
Total Discharge in koyna River: 32,100 Cusecs
Rainfall in mm-(Daily/Cumulative)
Koyna- 35/3290
Navaja- 31/3825
Mahabaleshwar- 40/3415