कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील 78 ग्रामपंचायतसाठी मतमोजणी प्रक्रिया नुकतीच पार पडली आहे. दरम्यान, सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार गट, अजित पवार गट, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट, भाजप, शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्याकडून आपापले उमेदवार उभे करण्यात आले होते. सातारा जिल्ह्यातील महत्वाचा तालुका असलेल्या कराड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या गटाने डंका पहायला मिळाला आहे. कराड उत्तर आणि दक्षिण मधील ग्रामपंचायत निवडणुकीत १२ पैकी ९ ठिकाणी पवार गटाने सत्ता प्रस्थापित केली आहे.
सातारा जिल्ह्यातील 78 ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान झालं. या ग्रामपंचायतीसाठी आज मतमोजणी प्रक्रिया पार पडली. कराड तालुक्यातील १२ ग्रामपंचायत पैकी ९ ग्रामपंचायतीवर खा. शरद पवार गटाने तर २ ग्रामपंचायतीवर काँग्रेसने विजयाचा झेंडा फडकवला आहे. तर रेठरे बुद्रुक ही १ ग्रामपंचायत भाजपच्या डॉ. अतुल भोसले यांच्या हाती आली आहे.
कराड तालुक्यातील शेळकेवाडी ग्रामपंचायतीच्या आठही जागा काँग्रेस नेते उदयसिंह पाटील उंडाळकर व माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण गटाच्या निवडून आल्या आहेत. या ठिकाणी सरपंचपदी प्रकाश तुकाराम शेळके यांची बिनविरोध निवड झाली आहे.
कराडमधील येणपे ग्रामपंचायतीमध्ये सत्ता कायम राखण्यात काँग्रेसला यश आले आहे. ग्रामपंचायतीमध्ये माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण व दिवंगत माजी मंत्री विलासकाका पाटील उंडाळकर गटाने सत्ता राखली आहे. तर या ठिकाणी मनीषा प्रताप शेटे या सरपंच झाल्या आहेत.
कराडच्या टेंभु ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीचे खा. शरद पवार यांच्या गटाकडे आली असून या ठिकाणी आ. बाळासाहेब पाटील यांच्या पॅनेलने बाजी मारली आहे. येवती, शेळकेवाडी ग्रामपंचायत राष्ट्रीय काँग्रेस पृथ्वीराज चव्हाण यांचे समर्थक उदयसिंह पाटील उंडाळकर यांचं पॅनेल विजयी झाले आहे. तर कराड तालुक्यातील हेळगाव ग्रामपंचायतीचा निकालही समोर आला असून आमदार बाळासाहेब पाटील गटाचा या ठिकाणी विजय झाला आहे. 7/3 अशा फरकाने पाटील यांच्या गटाच्या पॅनेलने विजय मिळवला आहे.
येवतीत उंडाळकर व चव्हाण गटाच्या ९ जागा विजयी
येवती ग्रामपंचायत निवडणुकीत येवती ग्रामपंचायतीच्या 10 पैकी 9 जागा उदयसिह पाटील उंडाळकर व आ.पृथ्वीराज चव्हाण गटाच्या भैरवनाथ रयत पॅनलच्या निवडून आल्या आहेत. तर विरोधी डॉ.अतुल भोसले गटाच्या भैरवनाथ ग्रामविकास पनेलकडे फ़क्त 1 जागा आली आहे. या ठिकाणी सरपंचपदी उंडाळकर – चव्हाण गटाच्या हिराबाई भगवान गुरव यांची निवड झाली आहे.
टेंभू ग्रामपंचायतीच्या निकालानंतर कार्यकर्त्यांमध्ये राडा
कराड तालुक्यातील टेंभू ग्रामपंचायत निकाल लागला असून आज सकाळी मतमोजणी केंद्राबाहेर टेंभू ग्रामपंचायतीच्या निकालावेळी कार्यकर्ते व पोलिस यांच्यात झटापट झाली. घोषणा देण्याच्या कारणावरून एका गटातील कार्यकर्त्यांनी राडा घालण्यास सुरुवात करताच या ठिकाणी पोलीस दाखल झाले. तसेच पोलिसांनी किरकोळ लाठीचार्ज करून जमाव पांगवित कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
रेठरे बुद्रुकमध्ये डॉ. अतुल भोसलेंचे पॅनल विजयी
कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. या ठिकाणी भाजप नेते डॉ. अतुल भोसले विरुद्ध काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या गटाची लढत होती. दोघांची या ठिकाणी होणाऱ्या निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लागली होती. दरम्यान, या ठिकाणी भाजप नेते डॉ. अतुल भोसले यांचे पॅनेल विजयी झाले आहे. सरपंच पदासह त्यांचे पॅनेल विजयी झाले असून काँग्रेससह महाविकास आघाडीच्या एकत्रित पॅनेलचा पराभव झाला आहे.
वाईत अजित पवार गटाकडून भाजपचा दारुण पराभव
सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात अजित पवार गटाचे आमदार मकरंद पाटील यांच्या गटाची सत्ता आली आहे. वाईमधील चिंधवली ग्रामपंचायतीवर आमदार मकरंद पाटील यांच्या गटाने सत्ता मिळवत भाजपचा दारुण पराभव केला आहे.
पाटणला 18 पैकी 12 ग्रामपंचायतीवर मंत्री देसाई गटाची सत्ता
पाटण तालुक्यातील 18 ग्रामपंचायतीसाठी काल मतदान झाले. तर आज मतमोजणी प्रक्रिया पार पडली आहे. दरम्यान, या ठिकाणी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या गटाने १८ पैकी १२ ग्रामपंचायतींवर सत्ता मिळवली आहे. तर माजी मंत्री विक्रमसिह पाटणकर गटाकडे ४, काँग्रेसकडे १ ग्रामपंचायत गेली आहे. तर एका ग्रामपंचायत समितीची भूमिका तटस्थ आहे. तालुक्यातील महत्वाची ग्रामपंचायत असलेल्या मल्हारपेठ ग्रामपंचायतीत मंत्री देसाई यांच्या गटाने विजय मिळवला आहे. देसाई गटाचे सरपंच पदाचे उमेदवार किरण दशवंत यांचा विजय झाला आहे.