साताऱ्यात महायुतीचे 5 विद्यमान आमदार आघाडीवर तर महाविकास आघाडीचे तिघे पिछाडीवर

0
3
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघातील सातारा, वाई, माण, कोरेगाव आणि पाटण या मतदार संघात विद्यमान आमदारांनी सुरूवातीला आघाडी घेतल्याचं चित्र समोर येत आहे. कराड दक्षिण, कराड उत्तर आणि फलटण या मतदार संघातील विद्यमान आमदार मात्र पिछाडीवर पडले आहेत.

साताऱ्यातून शिवेंद्रराजेंची मोठी आघाडी

जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघापैकी केवळ सातारा विधानसभा मतदार संघातील निवडणूक एकतर्फी होती. मतमोजणीत ते स्पष्ट होताना दिसत आहे. भाजपाचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी याठिकाणी मोठी आघाडी घेतली आहे. त्यांच्या विरोधात शिवसेनेचे (उबाठा) अमित कदम खूप मोठ्या फरकाने पिछाडीवर पडले आहेत.

वाईमध्ये आमदार मकरंद पाटील आघाडीवर

वाई विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) आमदार मकरंद पाटील यांनी आघाडी घेतली आहे. प्रत्येक फेरीमध्ये त्यांचं मताधिक्क्य वाढत आहे. राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) अरुणादेवी यांनी मकरंद पाटलांना तुलनेने चांगली लढत दिली असली तरी त्यांना आघाडी घेता आलेली नाही.

माणमध्ये जयकुमार गोरेंचा करिष्मा

माण-खटाव विधानसभा मतदार संघातील भाजपाचे आमदार जयकुमार गोरे हे आपल्या सर्व विरोधकांवर भारी पडले आहेत. त्यांनी टपाली मतदानातच आघाडी घेतली होती. त्यानंतरच्या फेऱ्यांमध्येही ते आघाडीवर राहिले आहेत. सातव्या फेरीअखेर गोरे यांची आघाडी २९ हजारावर पोहोचली आहे. राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) उमेदवार प्रभाकर घार्गे हे खूप पिछाडीवर पडले आहेत.

पाटणमध्ये काँटे की टक्कर

पाटण विधानसभा मतदार संघात शिवसेनचे (शिंदे गट) विद्यमान आमदार आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सुरूवातीपासून आघाडी घेतली आहे. त्यांना शरद पवार गटाचे बंडखोर उमेदवार आणि पारंपारिक विरोधक सत्यजितसिंह पाटणकर यांनी तगडी फाईट दिली आहे. दोघांच्या मतांमधील अंतर फार नाही. त्यामुळे याठिकाणी काँटे की टक्कर दिसत आहे.

कराड उत्तरमध्ये भाजपाचं कमळ फुलणार

कराड उत्तर विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे (शरद पवार) विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. भाजपाचे उमेदवार मनोज घोरपडेंनी याठिकाणी मोठी आघाडीत घेत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. सलग पाचवेळा निवडून आलेले आमदार बाळासाहेब पाटील पराभवाच्या छायेत आहेत.

कोरेगावात आमदार महेश शिर्देची आघाडी वाढली

कोरेगाव मतदार संघात यंदा चुरस पाहायला मिळाली होती. परंतु, मतमोजणीत आमदार महेश शिंदे यांनी ५ हजाराची आघाडी घेतली आहे. राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) उमेदवार शशिकांत शिंदे सुरुवातीपासूनच पिछाडीवर पडले आहेत. शिवसेनेच्या महेश शिंदे यांची आघाडी अखेरपर्यंत कायम राहिल्यास याठिकाणी शरद पवार गटाला धक्का बसू शकतो.

कराड दक्षिणमधून पृथ्वीराज चव्हाण पिछाडीवर

गेली सत्तर वर्षे काँग्रेसचा एकहाती गड राहिलेल्या कराड दक्षिणमध्ये काँग्रेसचे उमेदवार आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना भाजपा उमेदवार डॉ. अतुल भोसले यांनी कडवी लढत देत आघाडी घेतली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात दोनवेळा पराभूत झालेल्या डॉ. अतुल भोसलेंनी यंदा काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात मुसंडी मारली आहे. मात्र, त्यांची आघाडी अखेरपर्यंत टिकली तरच कराड दक्षिणमध्ये भाजपाचं कमळ फुलू शकतं.

फलटणमध्ये राजे गटाची चिंता वाढली

फलटणमध्ये राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) उमेदवार आमदार दीपक चव्हाण यांच्यावर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे उमेदवार सचिन कांबळे यांनी आघाडी घेत राजे गटाला धक्का दिला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर याठिकाणी मोठी राजकीय उलथापालथ झाली होती. अजित पवार गट सोडून आमदार दीपक चव्हाण हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत दाखल झाले होते. त्यामुळे भाजपाच्या सचिन कांबळे यांनी अजित पवारांच्या पक्षात प्रवेश करून उमेदवारी घेतली.