सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात अजूनही पाऊस सुरूच असून शुक्रवार आणि शनिवार कोयना धारण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाने हजेरी लावली. कोयनानगर येथे १०७, नवजा १२९ आणि महाबळेश्वरला ४९ मिलीमीटरची नोंद झाली तर एक जूनपासून कोयनेला १ हजार ८०६, नवजा १ हजार ५९६ आणि महाबळेश्वरला १ हजार ६८५ मिलीमीटर पाऊस पडला आहे. कोयना धरणात ६१.५२ टीएमसी पाणीसाठा झाला होता. ५८.४५ टक्केवारी झाली आहे.
सातारा जिल्ह्यात यावर्षी मे आणि जून महिन्यातील दमदार पाऊसझाल्यामुळे काही भागात पावसाने नवीन विक्रमही प्रस्थापित केला. तर कोयनानगर येथे जूनमध्ये १० वर्षांतील उच्चांकी पावसाची नोंद झाली आहे. तब्बल १ हजार ४६४ मिलीमीटर पर्जन्यमान झाले आहे. त्यामुळे जूनमध्येच धरणातील पाणीसाठाही ५० टीएमसीवर पोहोचला होता. सातारा जिल्ह्यात जून ते सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. या पावसावरच वर्षभराचे शेती, औद्योगिक, सहकार तसेच बाजारपेठेचे गणित अवलंबून असते. त्यामुळे मान्सूनचा पाऊस कसा आणि किती होईल याकडे सर्वांचेच लक्ष असते. त्यातच जिल्ह्याच्या पश्चिम बाजूच्या जावळी, पाटण, सातारा आणि महाबळेश्वर तालुक्यांत धुवाधार पाऊस होतो.
जून ते ऑगस्ट हे तीन महिने या तालुक्यांत पाऊस उसंतच घेत नाही. यावर्षीही पश्चिम भागात आतापर्यंत पावसाने दमदार बॅटिंग केलेली आहे. यामुळे पेरणी खोळंबलीय. तसेच प्रमुख धरणांत ही मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झालेला आहे. तर कोयनानगरच्या पावसानेही विक्रमाची नोंद केलेली आहे. पाटण तालुक्याच्या पश्चिम भागातील कोयना खोऱ्यात जोरदार पाऊस होतो. यावर्षी जून महिन्याच्या मध्यापासून पावसाने कोयना धरणक्षेत्रात संततधारेला सुरूवात केली. त्यामुळे अवघ्या १५ दिवसांतच या पावसाने मागील १० वर्षांतील जून मधील विक्रमी पावसाची नोंद केली. मागील १० वर्षांची कोयनानगरची सरासरी काढली तर साधारणपणे ८०० ते ९०० मिलीमीटर पाऊस होतो. पण, यंदा जूनमध्ये तब्बल १ हजार ४६४ मिलीमीटर पाऊस पडला आहे. यामुळे कोयनानगरच्या पावसाने १० वर्षांतील नवीन विक्रम नोंदवला. पाटण तालुक्यातील नवजा, पाथरपूंज आणि महाबळेश्वर येथेही यंदा मागील वर्षीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाल्यामुळे कोयना धरणात ही जून महिन्यातच ५० टीएमसीवर पाणीसाठा झाला. धरण जवळपास ५० टक्के भरले होते. हेही मागील १० वर्षांतील विक्रमच ठरला आहे.