सातारा प्रतिनिधी | जिल्ह्यात गेल्या वर्षीचा दुष्काळ पुसून काढत वरुणराजाने यंदा जोरदार बरसात केली आहे. जिल्ह्याच्या पूर्व आणि पश्चिम भागात चांगलाच पाऊस होऊ लागला आहे. गुरूवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर आणि नवजाला चांगले पर्जन्यमान झाले आहे. दरम्यान, हवामान विभागाने सातारा जिल्ह्यास दोन दिवस येलो अलर्ट दिलेला असून कोयना धरणात 103.63 टीएमसी इतका पाणीसाठा झाला असून धरण 98.46 टक्के भरलं आहे.
जुलै महिन्यात अतिवृष्टी झाल्याने पश्चिम भागातील कोयना, नवजा, कास, तापोळा, बामणोली, महाबळेश्वरसह कांदाटी खोऱ्यात दाणादाण उडाली होती. लोकांना घराबाहेर पडणेही मुश्किल झाले होते. जवळपास १२ दिवस धो-धो पाऊस पडत होता. यामुळे कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळीसह उरमोडी या प्रमुख धरणांतील पाणीसाठा वेगाने वाढला. जुलै महिना संपताना या प्रमुख धरणांतील पाणीसाठा ८० टक्क्यांवर पोहोचला होता. तसेच ऑगस्ट महिना सुरू झाल्यानंतरही काही दिवस पावसाचे प्रमाण चांगले राहिले.
दरम्यान, आता परतीचा पाऊस पुन्हा सुरु झाला असून राज्यात काही जिल्ह्यांना हवामान विभागाने रेड अलर्ट तर काही जिल्ह्यांना ऑरेंज, येलो अलर्टचा इशारा दिलेला आहे. सातारा जिल्ह्यास देखील येलो अलर्टचा इशारा हवामान विभागाने दिला असून आज आणि उद्या मुसळधार पाऊस पडणार आहे. तसेच गेल्या तीन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे कोयना धरणात 10 हजार 30 क्युसेक पाण्याची आवक होऊ लागली आहे.
Koyna Dam
Date: 26/09/2024
Time: 08:00 AM
Water level: 2162’03” (659.054m)
Dam Storage:
Gross: 103.63 TMC (98.46%)
Live: 98.51 TMC (98.38%)
Inflow : 10,030 Cusecs.
Discharges
Radial Gate: 00 Cusecs.
KDPH: 00 Cusecs.
Total Discharge in koyna River: 00 Cusecs
Rainfall in mm- (Daily/Cumulative)
Koyna- 90/5443
Navaja- 133/6676
Mahabaleshwar- 77/6291