कराड प्रतिनिधी | मुसळधार पावसामुळे कोयना जलाशयात पाणी साठा होऊ लागला असल्यामुळे धरणातील पाणी पातळी वाढू लागली आहे. दरम्यान, आज दुपारी 4 वाजता धरणाच्या पायथा वीजगृहातून कोयना नदी पात्रात 1 हजार 50 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कोयना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा कोयना धरण प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.
गत आठवड्यापासून कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात दररोज सरासरी 3 – 4 टीएमसी इतकी वाढ होत आहे. सुमारे 105.25 टीएमसी साठवण क्षमता असलेले कोयना धरण सध्या 50 टक्के भरले आहे. पावसाचे प्रमाण वाढत असल्याने कोयना सिंचन विभागाने दि. 1 जुलैला कोयना नदीतील बंद केलेला पाण्याचा विसर्ग आज, चोवीस दिवसा नंतर पुन्हा सुरू करण्यात आला आहे.
आज दुपारी ठीक 4 वाजता धरणाच्या पायथा वीजगृहातील एक जनित्र संचातून वीजनिर्मिती करून पुर्वेकडे कोयना नदीत 1050 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. त्यानंतर सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास कोयना धरणात 53.69 टीएमसी पाणीसाठा झाला असून धरणातील पाण्याची आवक 59 हजार 977 क्युसेकने सुरू होती. दरम्यान एक जून पासून सुरू झालेल्या तात्रिक वर्षात धरणातून पुर्वेला कोयना नदीत ३.११ टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला. यामध्ये नदी विमोचकातून ०.३३ टीएमसी व पायथावीजगृहातुन २.७७ टीएमसी पाण्याचा विसर्ग करत ७.४८१ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली आहे.