सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार अथवा कायदा हातात घेण्यासारख्या घटना तरुणांच्या हातून घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. मात्र, काहींना काही घटना या घडत आहेत. सातारा शहराजवळील महागाव येथील नदीजवळ एका तरुणाने हवेत गोळीबार केल्याची घटना आज बुधवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेनंतर पोलिसांनी संबंधित तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा नजीक असलेल्या महागाव जवळील नदीच्या शेजारी आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास संबंधित तरुणानी हवेत गोळीबार केल्याची घटना घडली. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी याची माहिती सातारा शहर पोलीस ठाण्यातील पोलिसांना दिली असता पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी घटनास्थळी जाऊन संबंधित तरुणाला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडे शस्त्र परवाना नसून त्याने हवेत गोळीबार का केला? याची कसून चौकशी केली जात आहे. यापूर्वीही संबंधित तरुणावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.