कुटुंबासमवेत फिरत असताना दुचाकीची बसली धडक; मलकापुरातील तरुण जागीच ठार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | घरापासून काही अंतरावरच कुटुंबासमवेत शतपावली करताना भरधाव दुचाकीच्या धडकेत तरुण जागीच ठार झाला. पत्नी, मुलगा, मुलीच्या डोळ्यासमोरच ही घटना घडली. कराड – ढेबेवाडी गणेश कॉलनीत सोमवार साडेनऊच्या सुमारास अपघात प्रसाद संतोष इनामदार (वय ४१, रा. गणेश कॉलनी, आगाशिवनगर, मलकापूर, ता. कराड) असे अपघातात ठार झालेल्याचे नाव आहे.

अपघातानंतर कराड ढेबेवाडी रस्त्यावरील वाहतूक काही काळ विस्कळित झाली होती. याबाबत पल्लवी संतोष इनामदार यांनी कराड शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रसाद इनामदार हे आई, वडील, पत्नी, मुलगी व मुलगा यांच्यासमवेत गणेश कॉलनी येथे अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहेत. ते जनकल्याण पतसंस्थेत लिपिकपदावर होते. सोमवारी रात्री जेवण करून ते पत्नी व मुलाबरोबर शतपावली करण्यासाठी गणेश कॉलनीच्या प्रवेशद्वाराजवळ आले होते.

मुलांसमवेत प्रसाद रस्त्यापलीकडील दुकानातून चॉकलेट घेऊन रस्ता पार करत होते. त्याचवेळी कराडकडून विंगकडे जाणाऱ्या अंकुश शिवाजी पुजारी मूळ राहणार कर्नाटक, सध्या रा. विंग) याच्या दुचाकीची (एमएच ५० ९ ५७११) रस्ता ओलांडणाऱ्या प्रसाद यांना जोरदार धडक बसली. या धडकेत प्रसाद रस्त्यावरील दुभाजकावर जाऊन पडले. अपघात होताच प्रसाद यांच्या पत्नीने ओरडून कॉलनीतील नागरिकांना सांगितले. नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेतली.

प्रसाद यांना तातडीने उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. दुचाकीस्वार अंकुश पुजारी जखमी झाल्याने त्यालाही नागरिकांनी उपचारासाठी तातडीने कृष्णा रुग्णालयात दाखल केले. अपघाताची माहिती मिळताच कराड शहर पोलिस ठाण्याच्या अपघात विभागातील सहायक पोलिस निरीक्षक एम. जी. चव्हाण, हवालदार धीरज चतुर यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

प्रसाद हे मनमिळाऊ शांत, संयमी, स्वभावाचे होते. प्रत्येकाला मदत करायचे, शिवतेज गणेश मंडळात त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे. प्रसाद यांच्या मागे आई, वडील, पत्नी, चार वर्षांचा मुलगा, दीड वर्षाची मुलगी असा परिवार आहे.