कराड-मसूर रोडवर कार-दुचाकीच्या धडकेत युवकाचा मृत्यू; कारचालकावर गुन्हा दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | रात्रीच्यावेळी दुचाकीवरून निघालेल्या युवकाला भरधाव चारचाकी कारने जोरदार धडक दिल्याची घटना कराड-मसूर रोडवर बनवडी गावच्या हद्दीत सिताराम सिटी समोर शुक्रवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. चारचाकी वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.

अजय विलास चव्हाण (वय 33, रा.कोपर्डे हवेली) असे अपघातात मृत्यू पावलेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी कारचालक प्रमोद शिंदे (रा.कोपर्डे हवेली) याच्या विरोधात कराड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शनिवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास अजय चव्हाण हा दुचाकीवरून विद्यानगर बाजूकडून कोपर्डेकडे निघाला होता. यावेळी कोपर्डे बाजूकडुन भरधाव वेगाने आलेल्या कारने दुचाकीला जोराची धडक दिली. यात अजय चव्हाण हा गंभीर जखमी झाला. त्याच्या डोक्यातून मोठा रक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अधिक माहिती घेतली. या अपघाताच्या घटनेचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक जगदाळे करीत आहेत.