कराड प्रतिनिधी | इंस्टाग्रामवर ओळख झाल्यानंतर विवाहाचे आमिष दाखवून सांगली जिल्ह्यातील युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी कराडातील युवकावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी पसार झाला असून पोलीस पथक त्याच्या मागावर आहे. पीडित युवतीने याबाबतची फिर्याद कराड शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. मानस भास्कर देसाई (रा. नम्रता रेसिडेन्सी, कराड) असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगली जिल्ह्यातील एका युवतीची कराड शहरातील मानस देसाई या युवकाशी मार्च 2021 मध्ये इंस्टाग्रामवर ओळख झाली. त्यांच्या ओळखीचे रुपांतर मैत्रीत व नंतर प्रेमात झाले. फेब्रुवारी 2022 पासून मानस देसाई हा संबंधित युवतीला भेटत होता. त्याने तिला विवाह करणार असल्याचे अमिष दाखवले होते. विवाह करणार असल्याची खात्री देत त्याने संबंधित युवतीला वेळोवेळी कराडात बोलावून ठिकठिकाणी वारंवार तिच्यावर अत्याचार केला. या कालावधीत युवतीने त्याच्याकडे लग्नाबाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. 4 मे 2024 पर्यंत मानस देसाई हा त्या यत्ततीला लग्नाबाबत टाळाटाळ करीत होता.
अखेर त्या युवतीने लग्नाचा तगादा लावल्यानंतर मानस देसाई याने, आपण दोघे आधी करिअरचा विचार करु, नंतर विवाहाचे बघू, असे म्हणून टाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही युवतीने लग्नाचा तगादा लावल्यामुळे मानस देसाई याने तिला शिवीगाळ दमदाटी करीत ठार मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अखेर पीडित युवतीने याबाबत कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर मानस देसाई याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांनी दिली.