मोलकरणीचे काम मिळवून चोरी करणाऱ्या कोरेगावमधील महिलेस येरवडा पोलिसांकडून अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | घरात मोलकरीणचे काम मिळवून चोरी करणाऱ्या एका महिलेला येरवडा तपास पथकाने अटक केली आहे. अटक करण्यात आलेली महिला ही कोरेगाव तालुक्यातील आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कल्याणीनगर येथील उच्चभ्रू सोसायटीमध्ये दि.२८/०५/२०२४ रोजी घरातील मोलकरीण हि फिर्यादी यांचे कपाटातून १३ लाख ३६ हजार ८०० रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने चोरी करुन घेऊन गेली. याबाबत येरवडा पो. स्टे. गु. र. नं. ३३५/२०२४ भादवि ३८१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा तपास करत असताना तपास पथकातील पोलीस अंमलदार पोलीस हवालदार तुषार खराडे, किरण घुटे व सुशांत भोसले यांना त्यांच्या बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, सदर गुन्हयातील आरोपी ही तिचे मुळ गावी किन्हई ता. कोरेगाव जि. सातारा येथे असलेबाबत माहिती प्राप्त झाली. सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक येरवडा पोलीस स्टेशन यांना कळविल्याने त्यांनी मिळालेल्या माहिती वरुन कारवाई करणेबाबत मार्गदर्शन केले.

त्याप्रमाणे तपास पथकाचे पो.उप. निरी. स्वप्निल पाटिल, व स्टाफ यांनी जावून संशयीत महिलेस ताब्यात घेतले. तिला नाव पत्ता विचारता तिने तिचे नाव सायली संतोष कार्वे वय २२ वर्षे रा.मु.पो. किन्हई ता. कोरेगाव जि. सातारा असल्याचे सांगितले. तिच्याकडे चौकशी करता तिने कल्याणीनगर भागात लहान मुलाचा सांभाळ करणेचे काम मिळवून सदर घरात प्रवेश करुन तेथील घरात चोरी केलेची कबूली दिली.

सदर महिलेस अटक करुन गुन्हा उघडकीस आणला आहे. पोलीस कस्टडी दरम्यान सदर आरोपी कडून १३ लाख ११ हजार ८०० रुपये किं.चे सोन्या-चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.

तसेच तिचेकडे अधिक तपास करता तिने आंबेगाव परिसरात सुध्दा एका घरात लहान मुलगा सांभाळण्याचे काम मिळवून तेथे सुध्दा चोरी केलेची कबुली दिली. त्यावरुन भारती विदयापीठ पोलीस स्टेशनच्या अभिलेखाची पाहणी करता भारती विदयापीठ पो.स्टे.गु.र.नं.४४९/२०२४ भादवि ३८१ गुन्हा उघडकीस आला आहे. सदर गुन्हयातील ४,००,०००/- किं.चे सोन्या-चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. असे एकूण २ गुन्हे उघडकीस आणून १७,११,८००/- रु.किं. चे सोन्या चांदीचे दागिनेचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.