पाटण प्रतिनिधी | पाटण तालुक्यातील तारळे धरणावर कळंबे येथे होऊ घातलेल्या अदानी ग्रीन एनर्जी प्रोजेक्टला तारळे विभागातील 102 गावांनी आपला कडाडून विरोध कायम ठेवला आहे. हा प्रोजेक्ट कोणत्याही परिस्थितीत होवू न देण्यासाठी 102 गावातील नागरिकांनी एकत्रित येत या प्रकल्पाविरोधात आंदोलनाची भूमिका घेतली आहे. मात्र, स्थानिक लोकांचा विरोध डावलून कंपनीने प्रकल्पाचे काम सुरू केल्याने नागरीकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
तारळे परिसरात कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी सदर काम तातडीने थांबवावे, अशी मागणी तारळी अदानी प्रकल्प विरोधी कृती समितीने जिल्हाधिकारी सातारा यांची प्रत्यक्ष भेट घेवून निवेदनाद्वारे केली आहे. याबाबतचे निवेदन कृती समिती सदस्यांनी जिल्हाधिकारी सातारा, पाटण तालुका उपविभागीय अधिकारी सुनील गाढे, तहसीलदार अनंत गुरव, उंब्रज पोलीस ठाणे यांना देण्यात आले आहे.
निवदेनात म्हटले आहे, ‘तारळी धरणावर उभारण्यात येत असलेल्या अदानी ग्रीन एनर्जी प्रोजेक्ट या वीजनिर्मिती प्रकल्पाला संपूर्ण तारळे विभागातून आमचा विरोध आहे. विभागातील तब्बल गावांनी तसे ठरावही केले आहेत. 12 मार्च 2024 रोजी तारळे विभागातील कळंबे येथे एमपीसीबी आणि प्रशासनाच्यावतीने यासंदर्भात सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीच्या अनुषंगाने एमपीएससी सातारा यांना साधारण एक हजारपेक्षा जास्त हरकती दाखल झाल्या होत्या.’
तसेच सुनावणीच्या दिवशी आणि नंतर अशा अनेक हरकती मिळाल्या आहेत. यावेळी प्रत्यक्ष सुनावणीला तारळे विभागातील शेकडो नागरीक उपस्थित होते. याशिवाय अनेक पर्यावरणवादी संघटना व सामाजिक कार्यकर्ते या सर्वांनीही या विनाशकारी प्रकल्पाला मोठा प्रखर विरोध दर्शविला आहे.
प्रकल्पास विरोध ‘ही’ आहेत मुख्य कारणे…
अदानींच्या प्रकल्पास विरोध करण्याची मुख्य कारणे अनेक आहेत. त्यामध्ये वनजमीन, इकोसेन्सेटिव्ह झोन, पावसाळ्याचा सर्व्हे, गौणखनिज उत्खनन, पशुपक्षी, धरणातील माशांच्या प्रजाती, बाधित लोकसंख्येची आकडेवारी, परिसरातील पीक उत्पादन, धार्मिक स्थळांना धोका, काम करताना ब्लास्टिंगचे तारळी धरणाच्या भिंतीसह जलस्रोत व घरांचे नुकसान, भूकंपप्रवण क्षेत्र, हिंस्र प्राण्यांचे स्थलांतर, या प्रकल्पामुळे तयार होणारे दूषित पाणी, रोजगार निर्मिती, सीएसआर फंड यासह अनेक चुकीच्या गोष्टींचा सर्व्हेत समावेश करण्यात आला आहे. या मुख्य कारणावरून लोकांनी सर्व्हेवर आक्षेप घेत प्रकल्पास विरोध केला.
प्रकल्प विरोधात हजारो हरकती दाखल...
पाटण तालुक्यातील कळंबे येथे उद्योगपती गौतम अदानी यांच्या १५०० मेगावॉट वीजनिर्मिती प्रस्तावित करण्यात येत आहे. या प्रकल्प उभारणीस येथील नागरिकांनी तीव्र विरोध केला आहे. या प्रकल्प विरोधात काही हरकरती असल्यास त्या दाखल करण्याचे आवाहन प्रदूषण नियंत्रण महामंडळाने केले होते. त्यानुसार लोकांना मोठ्या संख्येने हरकती दाखल केल्या. तसेच हा प्रकल्प रेटून नेला जात असल्याची जाणीव झाल्याने व याचे भविष्यातील स्थानिकांवर होणारे गंभीर परिणाम लक्षात घेऊन या विरोधात कृती समितीने जनतेच्या माध्यमातून उठाव केला. तसेच या प्रकल्प विरोधात हजारो हरकती दाखल केल्या.
हे पदाधिकारी होते उपस्थित?
यावेळी देवराज पाटील, बाळासाहेब सपकाळ, अभिजित जाधव, इंद्रजित पाटील, जोतिराम जाधव, हंबीरराव गोडसे, काशिनाथ भंडारे, नानासाहेब पन्हाळकर, बाळासाहेब जाधव, गणेश जाधव, भास्करराव गोरे, सचिन लवंगे, सदाशिव सपकाळ, सुरज गोरे, मारूती पवार, विजय यादव, अनिल कांबळे, गणेश जाधव, विश्वनाथ पवार, महिपतराव जाधव आदींसह तारळे खोऱ्यातील गावातील कृती समितीतील पदाधिकारी उपस्थित होते.