सातारा प्रतिनिधी | राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी घाटामध्ये बेंगरुटवाडी, ता. खंडाळा गावच्या हद्दीत अंदाजे 28 ते 30 वयाच्या एका विवाहित महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. संबंधित युवतीचा घात की अपघात याबाबत चर्चेला उधाण आले असून अन्य ठिकाणी घातपात करत सेफ झोन मानल्या गेलेल्या डपिंग ग्राऊंड अर्थात खंबाटकी घाटामध्ये मृतदेह टाकून देण्यात आल्याची शक्यता खंडाळा पोलिसांनी वर्तवली आहे.
बेंगरुटवाडी गावच्या हद्दीत खंबाटकी घाटातील एक वळणालगत एक मालट्रक बंद पडल्याने थांबलेल्या चालकाला कठड्याच्या बाजूला उग्र वास आल्याने चालकाचे खंबाटकी घाटातील दरीत लक्ष गेले. त्याठिकाणी एक महिलेचा मृतदेह दिसून आला. त्याने तत्काळ खंडाळा पोलीसांशी संपर्क साधला. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी खंडाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील शेळके, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष म्हस्के व खंडाळा पोलीस, शिरवळ रेस्क्यू टिमच्या सहकार्याने मृतदेह दरीतून काढला. खंडाळा येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले.
घटनास्थळी अपर पोलीस अधिक्षक डॉ. वैशाली कडूकर,फलटण पोलीस उप अधीक्षक अधिकारी राहुल धस, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने भेट दिली. संबंधित विवाहित महिलेच्या डोक्यात लोखंडी हत्याराने पाच ते सहा वार केले असल्याचे स्पष्ट झाले. वार वर्मी बसल्याने मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या घटनेची नोंद करण्याचे काम उशिरापर्यंत खंडाळा पोलीस स्टेशनला सुरु होते.पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील शेळके करत आहेत.