सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात आज शुक्रवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास एक धक्कादायक घटना उघडकीस आली. तालुक्यातील वीडणी गावात अंधश्रद्धेतून एका महिलेची हत्या करण्यात आली असून उसाच्या शेतात या महिलेचा शीर धडापासून वेगळे केलेला मृतदेह आढळून आला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात असणाऱ्या विडणी गावामध्ये पंचवीस फाटा जवळील ऊसाच्या महिलेचा अर्धवट मृतदेह आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास आढळून आला. शेतात कपड्यावर साडी, हळदी, कुंकू, काळी बाहुली, महिलेचे केस, सुरा आढळून आला. या परिसरातच अज्ञात महिलेचे अवयव वेगळे केलेला मृतदेह देखील आढळून आला.
दरम्यान, घटना घडल्यानंतर गावातील प्रदीप जाधव हे त्यांच्या उसाच्या शेतात पाहणी करण्यासाठी आले असता त्यांच्या ही बाब लक्षात आली. त्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली. माहिती मिळताच सातारा जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक समीर शेख यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर फलटण ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून अधिक तपास सुरू केला आहे.
असा आला प्रकार उघडकीस
फलटण तालुक्यातील विडणी येथील २५ फाटा परिसरात प्रदीप जाधव यांचे उसाचे शेत आहे. निर्मनुष्य ठिकाणी काही दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तीने एका महिलेचा खून करून मृतदेह उसाच्या शेतात टाकून फरार झाला असावा अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. संबंधित मृतदेह अर्धवट तसेच सडलेला आहे. हिंस्र प्राण्यांनी कबरेपासून सडलेला भाग उसाच्या शेतातून बाहेर ओढून आणला. तेव्हा शुक्रवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला.
पोलिस अधिकाऱ्यांनी केली शेतात पाहणी
पोलिस पाटील शीतल नेरकर यांनी घटनेची माहिती फलटण ग्रामीण पोलिसांनी दिली. त्यानंतर पोलिस उपअधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय अधिकारी राहुल धस, पोलिस निरीक्षक सुनील महाडीक, पोलिस उपनिरीक्षक मच्छींद्र पाटील, शिवाजी जायपत्रे, शिवानी नागवडे यांनी भेट देऊन परिसरातील उसाच्या शेतात पाहणी केली.
गुलाल अन् कापलेले काळे केस…
ज्या ठिकाणी महिलेचा मृतदेह आढळून आला. त्या ऊसाच्या शेतात काही अंतरावर नारळ, गुलाल, महिलेचे केस कापलेले, तेलाचा दिवा, काळी बाहुली, सुरी आढळून आली. त्यामुळे हा प्रकार नरबळी असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.