वैरण काढत असताना घोणस चावल्याने महिलेचा दुर्दैवी मृत्यू

0
1848
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | घराच्या पाठीमागील गंजीतून जनावरांसाठी वैरण काढत असताना घोणस सापाने दंश केल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची घटना पाटण तालुक्यातील गुढे येथे घडली. शशिकला रमेश पाटील (वय ४५) असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेची नोंद ढेबेवाडी येथील पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.

याबाबतची माहिती अशी की, पाटण तालुक्यातील गुढे येथील शशिकला पाटील या शनिवारी सायंकाळी त्यांच्या राहत्या घराच्या पाठीमागे असलेल्या गंजीतून जनावरांसाठी चारा काढत असताना त्यांना घोणस जातीच्या सापाने चावा घेतला. त्यांच्या हा प्रकार लक्षात आला नाही. मात्र, घरात गेल्यावर त्या बेशुद्ध पडल्यानंतर कुटुंबीयांनी तातडीने त्यांना उपचारासाठी प्रथम तळमावले येथील खासगी रुग्णालयात आणि त्यानंतर कराड येथील कृष्णा रुग्णालयात दाखल केले.

ग्रामस्थांनी घटनास्थळी शोध घेतल्यावर घोणसनेच त्यांना दंश केल्याचे स्पष्ट झाले. कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू असताना रात्री त्यांचे निधन झाले. उत्तरीय तपासणीनंतर रविवारी त्यांचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. सकाळी गुढे येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शशिकला पाटील मनमिळाऊ स्वभावाच्या होत्या. त्यांच्या मागे पती, दोन मुले, पुतणे असा परिवार आहे. येथील पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.