टँकर अन् दुचाकीच्या अपघातात महिला जागीच ठार; लोणंद-सातारा रस्त्यावरील सालपे घाटातील घटना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । लोणंद राष्ट्रीय महामार्गावर सालपे ता. फलटण गावच्या हद्दीत सालपे घाटात भरधाव वेगात आलेल्या टँकरने दुचाकीला मागून धडक दिल्याने दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या विवाहितेचा जागीच मृत्यू झाला. काल रविवार दि. 24 रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली.

तनुजा नितेंद्र अनपट (वय 31, रा. अनपटवाडी ता. कोरेगाव) असे मृत महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवार दि. 24 रोजी तनुजा या त्यांचा पुणे येथे कंपनीत कामाला असणारा भाऊ महेश भुजंगराव शिंदे (वय 25, रा. चौधरवाडी) यांच्यासोबत दुचाकीवरुन (क्र.MH 11 DP 6881) गावाहून पुण्याला असणाऱ्या बहिणीकडे निघाल्या होत्या. सायंकाळी पाचच्या सुमारास ते सालपे घाटात पोचल्यावर सातारा बाजूकडून लोणंद बाजूकडे भरधाव वेगात येणाऱ्या टँकरने (क्र.NL 09 AD 9146) त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली.

यावेळी टँकरचे चाक अंगावरून गेल्याने तनुजा जागीच ठार झाल्या. तर भाऊ महेश याच्या डोक्याला हेल्मेट असल्याने त्याच्या हातापायास गंभीर दुखापत झाल्याने त्यास उपचारा करता तातडीने लोणंद येथील खासगी दवाखान्यात दाखल केले. सदर घटनेची फिर्याद रितेश सर्जेराव अनपट यांनी लोणंद पोलीस स्टेशनला दिली असून तपास पोलीस हवालदार बनकर करीत आहेत.