कराड प्रतिनिधी | कराड ते ढेबेवाडी रस्त्यावर डंपरने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवर बसलेली महिला रस्त्यावर पडली आणि तिच्या अंगावरुन डंपरचे चाक गेल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना दुपारी १ वाजण्याच्या सुमार मालदन येथील स्टॉपजवळ घडली. तर या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे.
जयश्री शशिकांत पाटील असं अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे तर शशिकांत विष्णू पाटील (वय ५३, दोघेही रा. गुढे, दिंडेवाडी) असं जखमी व्यक्तीचे नाव आहे. याबाबत घटना स्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, जयश्री शशिकांत पाटील आणि शशिकांत विष्णू पाटील हे दाम्पत्य भाजीपाला विक्रीसाठी मोटारसायकलवरुन (एमएच १२ पीजी ७९५८) ढेबेवाडी येथे जात होते. कराड- ढेबेवाडी रस्त्यावर मालदन स्टॉपजवळ दुपारी एकच्या सुमारास डंपरने (एमएच १० डीटी ५८०६) मोटारसायकलला मागून धडक दिली. या घटनेत जयश्री पाटील या रस्त्यावर पडल्या आणि त्यांच्या अंगावरून डंपर गेला.
या अपघातात जयश्री पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. तर डंपरने जोरदार धडक दिल्याने शशिकांत पाटील रस्त्याचा बाजूस पडले. ते गंभीर जखमी झाले असून त्यांना कराड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. याबाबत ढेबेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे काम उशिरापर्यंत सुरु होते.