महिलेची दोन चिमुकल्या मुलींसह तलावात उडी मारून आत्महत्या, पतीचाही आत्महत्येचा प्रयत्न

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | एका महिलेनं दोन चिमुकल्या मुलींसह तलावात उडी मारून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात घडली आहे. या घटनेमागील कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात एका महिलेने आपल्या दोन चिमुकल्या मुलींसह गावालगतच्या तलावात उडी मारुन जीवन संपवलं आहे. ही घटना समजल्यानंतर पतीनेही विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, तो बचावला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे माण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

पतीचाही आत्महत्येचा प्रयत्न

सातारा जिल्ह्यातील धामणी (ता. माण) गावातील ऐश्वर्या स्वप्नील चव्हाण (वय २५) हिने सोमवारी मध्यरात्री शिवानी (वय ३ महिने) आणि स्वरांजली (वय ६ वर्षे) या मुलींसह गावलगतच्या तलावात उडी मारून जीवन संपवलं. या घटनेची माहिती कळताच पती स्वप्नील बापू चव्हाण (वय २८) याने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, त्याला म्हसवड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानं तो बचावला. त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

तलावातून तिघांचे मृतदेह बाहेर काढले

या खळबळजनक घटनेची माहिती मिळाल्यानंतर मृत महिलेच्या दीराने पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर म्हसवड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तिन्ही मृतदेह तलावातून बाहेर काढले. दरम्यान, या घटनेमागील नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. घटनेचं गांभीर्य ओळखून सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार तपास करत आहेत.