सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात शेअर मार्केटच्या नावाखाली पैशांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. अशीच फसवणुकीची घटना सातारा जिल्ह्यात घडली असून व्हॉट्सॲप ग्रुपवर ॲपची माहिती देत वेगवेगळ्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यास सांगून येथील एका महिलेची १५ लाख ७१ हजार १२० रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी दोघांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
क्रिशन दलबीर, सुभाष बहादूरसिंग अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. त्यांनी तक्रारदार महिलेशी व्हॉटस्ॲपवर संपर्क साधला होता. त्यानंतर एका ॲपची माहिती देत त्यांनी त्या महिलेला वेगवेगळ्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले. तसे केल्यास मोठा फायदा मिळण्याचे आमिष त्यांनी दाखविले होते.
त्यासाठी महिलेकडून त्यांनी वेळोवेळी १५ लाख ७१ हजार १२० रुपये ऑनलाइन घेतले, तसेच सायबर क्राईम ऑनलाइन पोर्टलवर दिलेल्या तक्रारीमधील नऊ लाख ९० हजार रुपयांची रक्कम संशयिताने काढून घेतल्याचे संबंधित महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. उपनिरीक्षक विजय शिर्के तपास करत आहेत.