सातारा प्रतिनिधी | भाजपचे साताऱ्यातील नेते तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केली. ३ कोटींच्या खंडणी प्रकरणात सातारा पोलिसांनी या महिलेला अटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार, जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेला 1 कोटींची खंडणीची रक्कम स्वीकारताना अटक केली आहे. सातारा पोलिसांनी ही कारवाई केली आहे. जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेने हे प्रकरण मिटवण्यासाठी 3 कोटी रुपयांची मागणी केली होती. यातील 1 कोटी खंडणीची रक्कम स्वीकारताना त्या महिलेला अटक करण्यात आली आहे. सातारा स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे.
प्रकरण मिटवण्यासाठी महिलेने ३ कोटींची मागणी केली होती. त्यामधील १ कोटी रुपयांची रक्कम घेताना महिलाला रंगेहात पोलिसांनी अटक केली. सातारा स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. जयकुमार गोरे यांनी सरसेनापती हंबीरराव मोहितेंच्या कुटुंबातील महिलेचा छळ केल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता.
नेमकं प्रकरण काय?
सातारा जिल्ह्यातील माण-खटाव मतदारसंघाचे जयकुमार गोरे हे सध्या मंत्रिमंडळात ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री आहेत. 2016 मध्ये काँग्रेसमध्ये असताना जयकुमार गोरे यांनी एका महिलेला स्वत:चे नग्न फोटो पाठवले होते, असे आक्षेपार्ह फोटो पाठवल्याप्रकरणी जयकुमार गोरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर अटक टाळण्यासाठी जयकुमारजे गोरे यांनी सातारा जिल्हा न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, न्यायालयाने अटकूपर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर जयकुमार गोरे यांना अटक होऊन दहा दिवस जेलमध्ये रवानगी करण्यात आली होती. त्यामुळे त्यांना जामीन मिळाला होता.
2016 मध्ये जयकुमार गोरे यांना या प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर या प्रकरणाची कुठेही चर्चा नव्हती. मात्र संबंधित महिलेला जानेवारी महिन्यात निनावी धमकीचे पत्र आले. त्यामुळे तिने पुन्हा जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करण्यास सुरुवात केली आहे. त्यानंतर संबंधित महिलेनं पत्र पाठवून कारवाईची मागणी केली होती.