सातारा प्रतिनिधी । ‘मै पोलिस इन्स्पेक्टर हू’ असे म्हणत हातातील अंगठी घेऊन कागदात दगड गुंडाळून देत वृद्धाची फसवणूक करण्यात आली असल्याची घटना साताऱ्यातील शाहूपुरी येथे घडली आहे. यामध्ये अज्ञातांकडून २० हजार रुपयांची सोन्याची अंगठी लंपास करण्यात आली. या प्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सातारा येथील दौलतनगरमध्ये राहणारे कलाप्पा व्यंकप्पा चव्हाण दि. २० मार्च रोजी सकाळी सहाच्या सुमारास भूविकास बँक चौक ते बसस्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरून निघाले होते. यावेळी संशयित दोघेजण तेथील एका नारळ पाणी दुकानासमोर दुचाकीशेजारी उभे होते. त्यावेळी त्यांनी तक्रारदार चव्हाण यांचा “आम्ही पोलिस आहोत,” असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला.
तसेच ‘मै पोलिस इन्स्पेक्टर हू’ असे सांगत सोने घालून फिरू नका म्हणत हातातील सोन्याची अंगठी द्या, व्यवस्थित गुंडाळून देतो, असे सांगितले. त्यानंतर अंगठी घेऊन चव्हाण यांना कागदात दगड गुंडाळून देण्यात आले. चव्हाण यांनी नंतर त्यांना दिलेला कागद उघडून पाहिला असता त्यांना त्यामध्ये दगड आढळून आले. त्यावेळी त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून सहायक फौजदार जाधव पुढील तपास करत आहेत.