पाटण प्रतिनिधी | पाटण तालुक्यातील कोयना नदीवर हेळवाक, पाटण येथे जल पर्यटन प्रकल्प विकसीत करण्यात येणार आहे. जल पर्यटन वाढीला चालना मिळाल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक येतील व त्यातून स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होणार आहे. .
कोयना नदीचा पूर्ण प्रवास सातारा जिल्ह्यातून होतो. तीची एकूण लांबी 41 किमी असून जल पर्यटनासाठी योग्य आहे. ही नदी प्रदूषण मुक्त नद्यांपैकी एक आहे. नदीच्या पात्रावर आजूबाजूस अनेक गावे वसलेली आहेत. तसेच पाटण हे मुख्य शहर नदीच्या लगत आहे. या जल पर्यटनामुळे आसपासच्या गावांना फायदा होणार आहे.
या जल पर्यटन प्रकल्पाचे दोन टप्पे असून हेळवाक ते गोशाटवाडी सहा किमी लांबीचे नदीपात्र आहे . याचे केंद्र हेळवाक आहे. तर दुसरा टप्पा गोशाटवाडी ते मल्हारपेठ असून याचे केंद्र पाटण आहे . हे 34 किमी लांब नदीचे पात्र आहे.
कोयना नदीच्या पाण्याचा प्रवाहस्तर स्थिर आहे. उच्च जल पर्यटनासाठी मोठी संधी आहे. जल पर्यटनाच्या माध्यामतून स्थानिक युवकांना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. युवकांसाठी उत्पन्नाचे मोठे साधन ठरणार आहे. यासाठी सर्व पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत.
रॅम्प ,जेट्टी, पव्हेलियन, फ्लोटिंग जेट्टी,जेट स्की पार्किंग जेट्टी यासारख्या पायाभूत सुविधांसह काय किंग, जेट स्की, वॉटर स्पोर्ट्स, बोटिंग, रिव्हर राफ्टींग, प्यारासिलिंग, बंपर राइड, बनाना राईड, सर्फिंग यासारखी जल पर्यटन आकर्षणे पर्यटकांसाठी निर्माण करण्यात येणार आहेत.
प्रकल्पाचे फायदे
या प्रकल्पामुळे कोयना धरणाचा परिसर लोकप्रिय ठरणार असून पाटण तालुका व कोयना नदीच्या परिसरातील स्थानिकांना याचा फायदा होणार आहे. तब्बल 40 किलोमीटर लांबीचे कोयना नदीचे पात्र असून पाण्याचा दर्जा उत्तम आहे. दर्जेदार जल पर्यटन विकासामुळे पर्यटकांचा ओघ या ठिकाणी वाढेल. कृषी आणि वन पर्यटनही वाढीला लागेल. या भागात मोठ्या प्रमाणावर पर्यटक येऊन यातून स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल व यातून त्यांचे जीवनमान उंचावण्यास मोठी मदत होईल.