पाटण प्रतिनिधी । पाटण तालुक्यातील कोयना धरणातील पाणीसाठा मे महिना अखेर कमी झाला असून तरी किमान दि. १५ जुलैपर्यंतही पाणी पुरेल असता अंदाज आहे. कोयना धरणात एकूण पाणीसाठा २१.९३ टीएमसी इतका असून मृतसाठा वगळता उपयुक्त पाणीसाठा १६.८१ टीएमसी आहे. रविवारी दुपारी सांगली पाटबंधारे विभागाची सिंचनाची मागणी कमी झाल्याने नदी विमोचकातून सुरू असलेला पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला आहे. सध्या पायथा वीजगृहातून २१०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीत सुरू आहे.
राज्यातील बहुतांशी भागांत पाणीबाणी सुरू असताना राज्यातील तारणहार ठरलेल्या कोयना प्रकल्पाकडे पाणी मागणीचा भार वाढला होता. यादरम्यान कोयना धरणाच्या पायथा वीजगृह व नदी विमोचकातून कोयना नदीपात्रात गेली चार महिने अपवाद वगळता अखंडपणे पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे पूर्वेकडील कोयना, कृष्णा नदीवर अवलंबून असलेल्या भागाची तहान भागली व शेतीला उपयुक्त ठरले. ऐन दुष्काळजन्य स्थितीत कोयना जलविद्यु त प्रकल्पामुळे वीजनिर्मितीसह कृष्णा, कोयना नदीकाठ जलसमृद्ध करत दुष्काळ भागांनाही दिलासा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य कोयना प्रकल्पाकडून झाले आहे.
१०५.२५ टीएमसी पाणीसाठा असलेल्या कोयना धरणातील तब्बल ४४.२५ टीएमसी पाणी हे धरणातून पूर्वेकडे सिंचन व पिण्यासाठी सोडण्यात आले आहे. सध्या धरणात २१.९३ टीएमसी पाणीसाठा शिल्लक असून जून महिन्यात जरी पावसाने दडी मारली तरी किमान १५ जुलैपर्यंत पुरेसा पाणीसाठा धरणात आहे. कोयना धरणातील गत दोन वर्षे कोयना जलविद्यु त प्रकल्पाने लवादाच्या मर्यादेपेक्षा अतिरिक्त पाण्याचा वापर वीजनिर्मिती करून राज्याची वीज संकटातून सुटका केली होती. चालू वर्षी तांत्रिक वर्ष संपायला अवघे चारच दिवस बाकी असताना लवादाने निर्धारित केलेला ६७.५० टीएमसी पाणीसाठ्यापैकी ५४.७६ टीएमसी इतकाच पाण्याचा वापर वीजनिर्मितीसाठी झाला.